पत्रकारीता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आजीबाईच्या शाळेला भेट
ठाणे प्रतिनिधी- दिगंबर वाघ ९४०४४५३५८८
. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संचालित पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकताच ठाणे ग्रामीण भागाचा अभ्यास दौरा करून ग्रामीण भागातील जनजीवन, आदर्श गाव योजना ग्रामपंचायत आदींची पाहणी केली. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील आजीबाईच्या शाळेला भेट देऊन तेथील अनोख्या शाळेत शिकत असलेल्या आजीबाईंशी संवाद साधला. मुलांच्या अभ्यासक्रमाचा हा भाग म्हणून हा दौरा आयोजित करण्यात आला होता
सदर दौरासाठी ठाणे जिल्हा परिषद, आजीबाईची शाळेचे जनक योगेंद्र बांगरसर, आनंद विश्व गुरूकुल महाविद्यालय तसेच पत्रकारीता अभ्यासक्रमाचे संयोजक शशिकांत कोठेकर, सहायक आकाश ढवळ, ठाणे जिल्हा परिषद जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण यांचे सहकार्य लाभले. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे इंगळे, समाजकल्याण खाते मुंबई सहायक आयुक्त समाधान इंगळे देखील अभ्यास दौरासाठी सहभागी झाले होते. सुरूवातीला धसई जवळील शिरवाडी या केवळ ३५ कुटुंब असलेल्या आदिवासी पाड्याला भेट देऊन आदर्श गाव म्हणून त्याचा कसा कायापालट गावकरयानी केला त्याची पाहणी विद्यार्थानी केली. एकेकाळी पाण्याचे दुर्भिष्य असलेल्या गावात आता बोअरला मे महिन्यातही पाणी असते. गावात कुरहाड बंदी असून प्रत्येक घरात शौचालय, शोष खड्डे, रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेले आहे. गावात सोलर दिवे बसवले आहेत.
विद्यार्थ्यानी दुपारच्या सत्रात मुरबाड तालुक्यातील भादणे गावात जेष्ठ महिलांसाठी चालवण्यात येत असलेल्या आजीबाईंच्या शाळेला भेट दिली. एकेकाळी अक्षर ओळखही नसलेल्या निरक्षर ३० आजीबाई शाळेत शिकत आहेत. दर शनिवार-रविवारी ही शाळा भरते. अगदी ९४ वर्षाच्या आजीबाई देखील न चुकता शाळेत येतात. बीबीसी देखील या शाळेची दखल घेतली असून आजीबाईच्या शाळेवर आता एक सिनेमा देखील येत आहे. योगेंद्र बांगर यानी भादणे गावात शाळेत शिक्षकाची नोकरी करीत असताना २०१६ पासून गावातील आजीबाईंसाठी शाळा सुरू केली. गावकरयानी देखील त्याना चांगली साथ दिली. आता शीतलताई मोरे या शिक्षीका आजीबाईना शिकवण्याचे काम करतात. पत्रकारीता अभ्यासक्रमाच्या एकूण ३५ मुले या दौरासाठी सहभागी झाले होते. मुरबाड तालुक्यात सध्या एक आगळीवेगळी शाळा भरली आहे. या शाळेत असलेले विद्यार्थी लहान मुलं नाहीत, तर चक्क आजी-आजोबा आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करुन थकलेले हात आता बाराखडी गिरवत आहेत.मुरबाड तालुक्यातील भदाणे येथील आजीबाईची हि शाळा सुरू आहेत. हे इतरांना आचार्य वाटण्यासारखे असून येथील नागरिकांनी याचा अतिशय चांगला उपयोग करून घेतला आहे