राज्यवखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक देणार कर्ज
राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध - सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
मुंबई प्रतिनिधी : लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास नजीकच्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक करता यावी आणि प्राप्त गोदाम पावतीवर ऑनलाईन पध्दतीने तारण कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्वावर ऑनलाईन तारण कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. पाटील म्हणाले, ही नाविन्यपूर्ण योजना प्रायोगिक तत्वावर तीन महिन्यांसाठी प्रथमता राबविण्यात येत आहे व यासाठी मिळणारा प्रतिसाद पाहून इतर बँकांच्या माध्यमातूनही सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
राज्य वखार महामंडळाची राज्यात विविध ठिकाणी गोदामे असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य तसेच शेतमाल, औद्योगिक मालाची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येते. गोदामातील साठवणुकीवर वखार पावती देण्यात येते. सादर वखार पावती वखार अधिनियम, १९६०नुसार पराक्रम्य (Negotiable) असून त्यावर बँकेमार्फत तारण कर्ज उपलब्ध होते. वखार पावतीवर शेतक-यास प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन विविध कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. परंतु या नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत शेतकरी वखार महामंडळाच्या संगणकीय प्रणाली आधारे ऑनलाईन पध्दतीने बँकेस तारण कर्जासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करु शकतात तसेच शेतक-यास यासंबंधीचे मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन त्याच्या स्मार्ट फोनच्या आधारे मराठी मध्ये अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्मार्टफोनद्वारे शेतक-यास आवश्यक कागदपत्रे स्कॅन करुन पाठविता येतील. त्यामुळे शेतकऱ्यांचा बँकेत जाण्याचा वेळ व पैसा वाचेल.
शेतकरी ठेवीदारांनी ऑनलाईन तारण कर्जासाठी अर्ज केल्यानंतर बँकेकडून हया अर्जाची छाननी केली जाईल व पात्र शेतक-यास वखार पावतीवरील याच्या शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के कर्ज बँकेकडून शेतक-यांच्या बँक खाते आरटीजीएस अथवा एनएफटी द्वारे जमा केले जाईल. शेतक-यास ऑनलाईन कर्जाची सुविधा एक ते दोन दिवसात उपलब्ध करुन दिली जाईल.
तारण कर्जाची व्याजदर ९ टक्के असून इतर बँकेच्या तुलनेत सर्वात कमी आहे. तारण कर्जाची मर्यादा रुपये ५ लाख प्रति शेतकरी एवढी असेल. वखार महामंडळाकडून शेतकऱ्यास साठवणूक भाड्यात ५०टक्के सवलत देण्यात येणार आहे. शेतक-यास प्रत्यक्ष बँकेत न जाता वेळोवळी कर्जाची रक्कम व त्यावरील व्याज याची माहिती त्याच्या मोबाईलवर नोटीफिकेशनद्वारे दिली जाईल आणि शेतमाल विक्री करावयाचा असल्यास बँकेचे मुद्दल व त्यावरील व्याज ऑनलाइन भरणा केल्यावर शेतक-याच्या वखार पावतीवरील बोजा कमी करण्यात येईल.
यामध्ये ब्लॉकतंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने तारण कर्ज देणे, त्याची परतफेड, सध्या बाजार भाव, उपलब्ध अन्न धान्य साठा, या सर्व गोष्टी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन होणार असल्याने शेतक-याचा मोठा फायदा होणार आहे आणि ऑनलाईन तात्काळ कर्ज उपलब्ध झाल्याने शेतकरी बांधवांची वेळेची बचत तसेच कागदपत्रांसाठीचा प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे, असेही पाटील यांनी संगितले
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...