मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ 16 हजार कोटींचे गुंतवणूक करार

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 चा प्रारंभ 16 हजार कोटींचे गुंतवणूक करार



 



महाराष्ट्रावर गुंतवणूकदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार
उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत -मुख्यमंत्री


            मुंबई प्रतिनिधी : एकीकडे कोरोनाशी लढतांना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे, त्यामु्ळे अर्थचक्राला गती मिळणार आहे. आपण दाखविलेला  विश्वास  सार्थ ठरवू.  राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योजकांना  उद्योग स्थापन करण्यात  कोणतेही अडथळे येणार  नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन)चा मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणूकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.


            अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणूकदारांसोबत हे करार करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे,मुख्य सचिव अजोय मेहता, उद्योग सचिव वेणूगोपाल रेड्डी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी व एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते.  व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ,ज्याप्रमाणे चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर नील आर्मस्ट्राँग याने उदगार काढले होते. एका व्यक्तीसाठी हे लहान पाऊल आहे, परंतु मानवजाती साठी मोठी झेप आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासाचे हे लहान पाऊल भविष्यात मोठी उलाढाल करणारी झेप ठरणार आहे. आज सुमारे सोळा हजार कोटी रुपयांचे तर नजीकच्या भविष्यकाळात  आणखी आठ हजार कोटींचे सामजंस्य करार करण्यात येणार आहेत.


            इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योगमंत्री श्री.सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्याऐवजी आता 48 तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.


            मुकेश आघी व वेणुगोपाल रेड्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. डब्ल्यूएआयपीएचे बोस्तजन स्कलार यांनी देखील डब्ल्यूएआयपीएच्या वतीने स्वाक्षरी केली.चीनचे भारतातील राजदूत वेडोंग सन, सिंगापुरचे वाणिज्यदूत गॅव्हीनचे,अमेरीकेचे वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्स  यांनी देखील आपले विचार मांडले.


सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम पुढीलप्रमाणे आहे


·       एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी


·       हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार


·       असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी


·       वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी


·       हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार


·       एपिजी डिसी (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार


·       इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन - रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार


·       पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500


·       इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500


·       रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी


·       युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000


·       ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042



·       वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


        दिगंबर वाघ
        कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 


        घरी राहा, सुरक्षित राहा 
        प्रशासनाला सहकार्य करा...