कोकण निसर्ग चक्रीवादळातील नारळ मदतीला केंद्राकडून विशेष समिती
कोकण निसर्ग चक्रीवादळ नारळ उद्यानांना मदतीसाठी केंद्राकडून विशेष समिती
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई प्रतिनिधी : कोकणातील चक्रीवादळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारने नारळ बागांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन मदत करण्यासाठी एक विशेष समिती गठीत केली आहे. या समितीला ३० जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत व्हीडिओ कॉन्फरन्स घेऊन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांच्याकडे विनंती केली होती. त्यांनी कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाच्या अध्यक्षतेत एक विशेष समिती गठीत केली आहे आणि या समितीला ३० जूनपर्यंत अहवाल देण्यास सांगितले आहे. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतील, तर आयसीएआर - सीपीसीआरआय, केरळचे प्रधान शास्त्रज्ञ आणि प्रकल्प संयोजक या समितीचे सदस्य असतील. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरूनियुक्त प्रतिनिधी, महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे संचालक हेही या समितीत सदस्य म्हणून असतील. कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे मुख्य नारळ विकास अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव असतील. फळबाग आयुक्त डॉ. बी. एन. एस. मूर्ती यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. या समितीचे गठन झाल्यामुळे नारळ उत्पादकांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी राहा, सुरक्षित राहा
प्रशासनाला सहकार्य करा...