महावितरणने विशेष यंत्रणा उभारावी

विशेष यंत्रणा राबवून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करा


               - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत



मुंबई प्रतिनिधी : कोरोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीत ग्राहकसेवेसाठी महावितरणने विशेष यंत्रणा उभारावी तसेच महसूल वाढीसाठी अधिक प्रयत्न करावेत. उपलब्ध मनुष्यबळाचे अंकेक्षण करून या मनुष्यबळाचा सुयोग्य वापर व्हावा यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश ऊर्जामंत्री  डॉ. नितीन राऊत यांनी दिले. 


      मंत्रालयात आयोजित महावितरणच्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री  डॉ. राऊत बोलत होते. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, कार्यकारी संचालक (देयक आणि वसुली)  योगेश गडकरी आदी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी ऊर्जामंत्री म्हणाले, ग्राहकांच्या मीटरचे प्रत्यक्ष रीडिंग घेऊन रिडींगप्रमाणे वीजबिल देण्यात यावे. सरासरी वीजबिल टाळावे, जेणेकरून वीजबिलाच्या तक्रारी कमी होतील. त्यासाठी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नियोजन करावे. धनादेशाद्वारे वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांच्या मदतीसाठी विशेष कक्ष स्थापन करावे. कोरोना कारणास्तव प्रतिबंधित क्षेत्रातील (कंटेन्मेंट झोन) वीजबिलाची वसुली वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. एकत्रित वीजबिल एकरकमी भरणाऱ्या ग्राहकांना 2 टक्के सवलत, याशिवाय तीन समान हप्त्यात वीजबिल भरण्याच्या सुविधेबाबत माहिती देऊन ग्राहकांच्या शंकांचे समाधान व त्यांना वीजबिल भरण्यास प्रोत्साहित करावे. सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या कामाचा अहवाल मागवून अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासावी. बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची आवश्यकता तपासावी आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून मनुष्यबळाचा सुयोग्य उपयोग करावा, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. 


     कोकण प्रादेशिक विभागात विविध योजनांमधून सुरु असलेल्या कामांचा आढावाही यावेळी डॉ. राऊत यांनी घेतला. योजनांमधील कामांचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करताना शंभर टक्के जागा उपलब्ध असण्याची दक्षता घ्यावी. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी. सप्टेंबर २०१९ ते मार्च २०२० या कालावधीतील कामांची प्रगती तपासावी व निकृष्ट दर्जाची कामे आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच तीनही कंपन्यांची मालमत्ता किती व कुठे आहे याची अद्ययावत नोंद ठेवण्यास व्यवस्था निर्माण करण्यात येणार असून त्यासाठी इस्टेट ऑफिसर राहणार असून तो सर्व माहितीची नोंद ठेवेल, असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.


निसर्ग वादळग्रस्त ग्राहकांना स्थिर आकारात सवलत


   निसर्ग चक्रीवादळामुळे महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात वीज वितरण यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले. बाधित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न झाले. अजूनही काही ठिकाणी काम सुरु आहे. वादळामुळे वीजपुरवठा बाधित झालेल्या वीज ग्राहकांचा स्थिर आकार माफ करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राऊत यांनी या बैठकीत दिली.


 दिगंबर वाघ  


        कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


 


घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏