राज्यातील सर्व गणेश मंडळांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा
- गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या असून त्याचे पालन सर्व गणेश मंडळांनी करावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी शासनाने काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
मर्यादित स्वरुपात मंडप
⚫ सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.
⚫ कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपा बाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.
गणपतीच्या मुर्तीची उंची मर्यादित
⚫ श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीसाठी २ फुटाच्या मर्यादित असावी.
⚫ यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघीगणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून श्री गणेशाचे आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.
आरोगय विषयक कार्यक्रम
⚫ उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिलास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
⚫ सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना,मलेरिया, डेंगू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.
⚫ आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
ऑनलाईन दर्शन
⚫ श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
⚫ गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सँनीटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
⚫ श्री च्या आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये.
⚫ महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏