पत्रकार पांडूरंग रायकर वाचू शकले असते
पुणे प्रतिनिधी : पुण्यात `टीव्ही 9' वृत्तवाहिनीसाठी काम करणारे तरुण आणि उमदे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे बुधवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. रायकर यांच्या मृत्यूची पार्श्वभूमी पाहिली तर अधिक हळहळ वाटते. त्यांच्या बाबतीत नीट काळजी घेतली गेली असती तर ते निश्चित वाचू शकले असते, असे एकूण चित्र पाहता वाटते. पांडुरंग रायकर यांना दि. २० ऑगस्ट रोजी थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यांनी त्वरित डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. डॉक्टरांना संशय आल्यामुळे रायकर यांची दि. २७ ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटीव्ह निघाली. दुसऱ्या दिवशी, म्हणजे दि. २८ ऑगस्ट रोजी, पांडुरंग रायकर हे अहमदनगर जिल्ह्यातील आपल्या कोपरगाव या गावी गेले. पण तेथे देखील त्रास सुरू राहिल्याने कोपरगावमध्ये त्यांची एंटीजेन टेस्ट करण्यात आली. ती पॉझिटीव्ह निघाली. त्यानंतर रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री रायकर यांना पुण्यात आणण्यात आले. त्यांना जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल देखील करण्यात आले. पण तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. कोरोनात रुग्णाची ऑक्सिजन पातळी घसरण्याचा धोका मोठा असतो. म्हणूनच ऑक्सीमीटरद्वारे दिवसातून चारवेळा तरी रुग्णाची ऑक्सिजन पातळी तपासली जाते. ती ९४पेक्षा खाली जाणे धोक्याचे मानले जाते. रायकर यांची ऑक्सिजन पातळी मंगळवारी ७८ पर्यंत खाली गेली. त्यांना श्वासोच्छवासास प्रचंड त्रास होऊ लागला. त्यांना इतरत्र हलविण्यासाठी कार्डिॲक ॲम्ब्युलन्सची गरज होती. अशी ॲम्ब्युलन्स मिळविण्यासाठी पत्रकारांनी धावपळ सुरू केली. अखेर मंगळवारी रात्री एक ॲम्ब्युलन्स मिळाली. पण दुर्दैवाने त्यातील व्हेंटीलेटर खराब असल्याचे सांगितले गेले. त्यानंतर दुसरी ॲम्ब्युलन्स मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तशी ॲम्ब्युलन्स मिळाली देखील. पण त्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरच उपलब्ध नव्हता. या साऱ्या धावपळीत मध्यरात्रीचे सव्वा बारा वाजले होते. पहाटे ४ ला ॲम्ब्युलन्स मिळविण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला. तोपर्यंत रायकर यांची प्रकृती अधिकच खालावली. पहाटे ५ वाजता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून ॲम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. अतिदक्षता विभागातील डॉक्टरांना `आम्ही निघतो आहोत', असा फोन आला. पांडुरंग रायकरांचे पत्रकार मित्र आणि नातेवाईक जम्बो हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रायकरांना हलविण्यासाठी ते डॉक्टरांना भेटले. पण पहाटे ५.३० वाजता त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. थोड्याच वेळात सुसज्ज अशी कार्डिॲक ॲम्ब्युलन्स जम्बो हॉस्पिटलला पोहोचली. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. पांडुरंग रायकर यांनी अकाली या जगाचा निरोप घेतला होता. जर कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स वेळीच उपलब्ध झाली असती तर पुढील प्रसंग टळला असता. रायकर वाचू शकले असते. त्यांच्या कुटुंबियांवर हे पहाडी संकट कोसळले नसते. दुर्दैवाने तसे घडले नाही. रायकर यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले आहेत. या चौकशीतून जे निष्पन्न व्हायचे ते होईल. पण रायकर काही परत येणार नाहीत. वास्तविक मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात कार्डिॲक ॲम्ब्युलन्ससारखे वाहन कॉल देताच काही मिनिटात उपलब्ध असायला हवे. ते नसेल तर अशी वाहने मोठ्या संख्येने खरेदी करायला हवीत. कोरोनाच्या रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्यास अशा वाहनांची नितांत गरज असते. पुण्यासारख्या शहरात कार्डिडाॅर ॲम्ब्युलन्स शोधण्यात आणि ती मिळविण्यात काही तास जावेत, हे लांच्छनास्पद आहे. एका ॲम्ब्युलन्समध्ये व्हेंटीलेटर खराब होता, तर दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टर उपलब्ध नव्हता, ही कारणे धक्कादायक आणि संतापजनक आहेत. रायकरांचा बळी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा बळी आहे. भविष्यात असे बळी जाऊ नयेत असे वाटत असेल तर रायकर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांना अद्दल घडायला हवी!
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा, अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏