ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही

ओबीसी  समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी


मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन  करणार


     -- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे



मुंबई प्रतिनिधी : ओबीसी समाजाचे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. ओबीसी समाजाच्यावतीने भेटीसाठी आलेल्या शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या बैठकीत ठाकरे बोलत होते. बैठकीस अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटे, माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि  ओबीसी समाजाचे, बारा बलुतेदार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.


      ओबीसी समाजाचे आरक्षण कमी होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाच्या मागण्यांची आणि प्रश्नांची आपल्याला जाणीव असून त्याची पूर्तता करण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करून ते प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन केली जाईल. या समितीने  ओबीसी समाजाच्या मागण्यांचा साकल्याने विचार करावा व जे निर्णय तात्काळ घेता येतील त्याची  प्रक्रिया गतिमान करावी. याच पद्धतीने निधीसाठीही मागणी करतांना प्राधान्याने हाती घ्यावयाची कामे निश्चित करावीत. मुख्यमंत्री  ठाकरे म्हणाले की, टप्प्याटप्प्याने ओबीसी समाजाचे प्रश्न आपण नक्की मार्गी लावू. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि त्यामुळे कामांची गती मंदावून आरोग्य या विषयाची प्राथमिकता वाढली. आता आपण अनलॉक प्रक्रियेमध्ये जीवनाला पुन्हा गती देत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.


     बैठकीत अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार  यांनी  तसेच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह उपस्थित ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींनी समाजाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.


  दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..