23 नोव्हेंबर पासून शाळा सुरु करण्याबाबत एसओपी तयार

23 नोव्हेंबर नंतर नववी - बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस!


 - शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड



मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने अनलॉकनंतर वाहतुक, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृह, बाजारपेठा सुरळीतपणे सुरू केलेल्या आहेत. याच पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असले तरी शिक्षण ऑनलाईन सुरु आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबर 2020 पासून राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत ‘एसओपी’ तयार करण्यात आली असून राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून मुख्यमंत्री यांच्या अंतीम मंजुरी मिळाल्यानंतर शाळा सुरु करण्यात येतील.


   कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या संदर्भात पालकांची परवानगी घेऊन आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळेतील कामकाज करण्यात येईल. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन परीक्षा मंडळातर्फे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या बरोबरच शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेऊन शाळा अध्ययन - अध्यापन प्रक्रिया व परीक्षा पार पाडण्यासाठी शासन सक्षमपणे विचार करेल, असे शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी नमूद केले आहे.


उद्यापासून दिवाळीची सुटी


     विद्यार्थी व शिक्षकांच्या भावनांचा आदर करून व त्यांच्या दिवाळीच्या सुटीच्या मागणीचा विचार करून शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच 07 ते 20 नोव्हेंबर 2020 पर्यत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पाच नोव्हेंबरच्या परिपत्रकानुसार 12 ते 16 नोव्हेंबर 2020 अशी सुटी देण्यात आली होती, यात आता बदल करून 14 दिवसाची सुटी जाहीर करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या निर्णयाचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले आहे.


  दिगंबर वाघ  


 कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..