चित्रपट व मनोरंजन क्षेत्राच्या धोरणनिर्मितीसाठी 5 ते 7 नोव्हेंबरदरम्यान चर्चासत्राचे आयोजन
- सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जन्मस्थान असून चित्रपट व करमणूक माध्यमांच्या क्षेत्रात कायमच अग्रेसर राहिले आहे. चित्रपट व माध्यम मनोरंजन क्षेत्रासाठी धोरण असावे या मुख्य उद्देशातून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून ५ ते ७ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ‘पॅनोरमा इन्वीशनिंग फिल्म मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट पॉलिसी फॉर महाराष्ट्र’ या विषयावर तीन दिवसीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
5 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने उद्घाटनपर सत्र सुरू होणार आहे. हे चर्चासत्र फेसबुक लाइव्ह व यूट्यूब च्या माध्यमातून सर्वांसाठी खुले राहणार आहे.या सत्राचा उद्देश या क्षेत्रातील महाराष्ट्राचे अग्रस्थान बळकट करणे, राज्य चित्रपट निर्मिती आणि मनोरंजन माध्यम केंद्र प्रस्थापित करणे आणि या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देणे असे असेल. चित्रपट व करमणूक माध्यम क्षेत्र गतीमान व्हावे यासाठी महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या वेबिनारमध्ये राज्यात जागतिक स्तरावरील चित्रीकरण केंद्र बनविणे,चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्रास उद्योगाचा दर्जा देणे,चित्रपट माध्यम व करमणूक क्षेत्राच्या वाढीसाठी सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे, चित्रपटसृष्टीशी निगडित पर्यटन आणि त्याचे फायदे यांचा अभ्यास करणे, प्रादेशिक चित्रपट निर्मितीस प्रोत्साहन देऊन चित्रपट,माध्यम व करमणूक क्षेत्रातील कौशल्य विकास वृद्धिंगत करणे यासारख्या सर्वांगीण विषयांचा समावेश असेल.
चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच चित्रपट सृष्टी व उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि अनेक नामवंत तज्ज्ञ सहभाग घेणार आहेत. या चर्चासत्राद्वारे राज्याचे चित्रपट, माध्यम व करमणूक धोरण आखण्यासाठी ठोस सूचना , मार्गदर्शन मिळणे तसेच या क्षेत्राच्या वाढीसाठी सुयोग्य वातावरण उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. चित्रपट व करमणूक माध्यमाचे प्रस्तावित धोरण तयार करताना या क्षेत्रातील समस्यांचे तातडीने प्रभावी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून या क्षेत्रातील तज्ञ नामवंतांची मते जाणून घेणे हा वेबिनार मागचा मुख्य हेतू आहे. याशिवाय महाराष्ट्र हे केवळ राष्ट्रीय स्तरावरील नव्हे तर जागतिक स्तरावरील निर्मात्यांसाठी आदर्श चित्रीकरण स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी करावयाच्या संभाव्य उपाययोजना जाणून घेण्याचा प्रयत्न या चर्चासत्राद्वारे करण्यात येईल. वेबिनार बाबतची तपशीलवार माहिती महामंडळाच्या www.filmcitymumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी, सांस्कृतिक क्षेत्रात रुची असणाऱ्या अधिकाधिक लोकांनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८
माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..