सोसायटीमध्ये अडचण आल्यावर तक्रार कोणाकडे कराल...

 तक्रार कोणाकडे कराल...

भाग ९ 

ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे 

दर आठवडयाला,दर सोमवारी...

        बऱ्याचवेळा सदस्यांना त्यांच्या अडचणीबाबत कोणाकडे तक्रार करावी याची माहिती नसल्याने ते चुकीच्या दप्तरी पत्रव्यवहार करत राहून मौल्यवान वेळ वाया घालवत असतात. मागील लेखात तुम्हाला अधिमुल्य आणि हस्तांतरण बाबत माहिती मिळाली. परंतु सदस्याला कोणती अडचण असल्यास कोणत्या दप्तरी अर्ज करावा... सदर लेखात याबाबत बऱ्याचदा विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्यासाठी...

प्रश्न क्र. ४४) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी निबंधकाकडे कराव्यात ?

उत्तर: 

१) खोटी माहिती सादर करून संस्थेच्या नोंदणीबाबत. 

२) भागपत्र निर्गमित न केल्याबाबत. ३)सदस्यत्वास नकार दिल्याबाबत. 

४) संस्थेकडून नामनिर्देशन नोंदणी न केल्याबाबत. 

५) भोगवटेतर शुल्काबाबत. 

६) हस्तांतरणासाठी जादा अधिमूल्याची मागणी केल्याबाबत. 

७) अभिलेखाच्या आणि दस्तऐवजाच्या प्रती न पुरविल्याबाबत. 

८) संस्थेच्या अभिलेखामध्ये अनधिकृत बदल, तो दडपून टाकणे अथवा नष्ट करणे याबाबत. 

९) समितीने धनादेश अथवा कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न स्वीकारणे याबाबत. 

१०) संस्थेचे अभिलेख व लेखापुस्तके न ठेवणे अथवा अर्धवट अवस्थेत ठेवणे याबाबत.

११) ठराविक अवधीमध्ये संस्थेचे वार्षिक हिशेब आणि अहवाल तयार न करणे याबाबत. 

१२) संस्थेचा निधीचा चुकीचा विनियोग अथवा निधी बाबत अफरातफर करणे याबाबत. 

१३) संस्थेचा कसूरदार/निरर्ह सदस्य याबाबत. 

१४) संस्थेच्या निधीची सर्वसाधारण सभेच्या पूर्व संमतीशिवाय गुंतवणूक करणे याबाबत. 

१५) हिशोबाचा मेळ बसविणे याबाबत. 

१६) लेखापरीक्षा, लेखापरीक्षा दुरुस्ती अहवाल याबाबत. 

१७) समितीची मुदत संपण्याअगोदर कायद्यानुसार निवडणुका न घेण्याबाबत. 

१८) नामनिर्देशन फेटाळण्याबाबत. 

१९) ठरावीक मुदतीमध्ये किंवा प्रत्येक वर्षी ३० सप्टेंबरपूर्वी सर्वसाधारण सभा न बोलविणेबाबत. 

२०) उपविधीमध्ये दर्शविल्याप्रमाणे समितीची बैठक आयोजित न करण्याबाबत. 

२१) समितीने दिलेल्या राजीनाम्याबाबत. 

२२) निबंधकाच्या अखत्यारितील इतर संबंधित विषय याबाबत. 

२३) वार्षिक विवरण आणि विवरण पत्र न दाखल करण्याबाबत.

प्रश्न क्र. ४५) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी सहकारी न्यायालयात कराव्यात ?

उत्तर: महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० याच्या कलम ९१ खालील अंतर्भूत असलेले सदस्य आणि किंवा संस्थेचे सदस्य यांच्यामधील खालील बाबींशी संबंधित विवाद सहकारी न्यायालयाकडे निर्देशित करण्यात येतील:

१) व्यवस्थापन समिती आणि सर्वसाधारण सभा यांचे ठराव 

२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५२ अ अन्वये तरतूद केल्याप्रमाणे नामनिर्देशन फेटाळण्यात आले असेल ते खेरीज करून व्यवस्थापन समितीच्या निवडणुकांबाबत 

३) मोठी/दुरुस्ती, अंतर्गत दुरुस्ती आणि गळती यांसह दुरुस्त्या 

४) वाहने उभी करण्याची जागा 

५) सदनिकांचे/भूखंडांचे वाटप 

६) बांधकाम खर्चाच्या दरांमध्ये वाढ होणे 

७) विकासक/ठेकेदार, वास्तुशास्त्रज्ञ यांची नेमणूक 

८) असमान पाणीपुरवठा 

९) सदस्यांकडील थकबाकीची जादा वसुली 

१०) सहकारी न्यायालयाच्या अखत्यारीत येणारे इतर कोणतेही विवाद.

प्रश्न क्र. ४६) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी दिवाणी न्यायालयात कराव्यात ?

उत्तर

१) बांधकाम व्यवसायी/विकासक यांनी/यांच्यात करारपत्रामध्ये दर्शविलेल्या अटी व शर्तीची पूर्तता न होणे; 

२) दुय्यम दर्जाचे बांधकाम; 

३) संस्थेच्या नावे मालमत्तेचे अभिहस्तांतरण पत्र;

४) बांधकाम दरामध्ये वाढ होणे; 

५) दिवाणी न्यायालयाच्या अखत्यारीत येणारे इतर कोणतेही विवाद.

प्रश्न क्र. ४७) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी स्थानिक प्राधिकारणांत कराव्यात ?

उत्तर: 

१) बेकायदेशीर बांधकाम/ज्यादा/पर्यायी बांधकाम: बांधकाम व्यवसायी/सदस्य/सदनिकेचा भोगवटादार यांच्याकडून करण्यात आलेले; 

२) संस्थेला व सदस्यांना होणारा अनियमित पाणीपुरवठा; 

३) सदस्याकडून/भोगवटादाराकडून वापरामध्ये बदल; 

४) इमारतीचे संरचना विषयक प्रश्न; 

५) महापालिका/स्थानिक प्राधिकरण यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या बाबी उदा. मालमत्ता कर, रस्त्यावरील दिवे कचरा आणि इतर नागरी सुविधा.

प्रश्न क्र. ४८) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी पोलिसांकडे कराव्यात ?

उत्तर: 

१) सदस्य/बांधकाम व्यवसायी/भोगवटादार किंवा कोणतीही अन्य व्यक्ती यांच्याकडून सदनिका, दुकान वाहने उभी करण्याची जागा मोकळी जागा याचा अनधिकृत वापर करून होणारा उपद्रव; 

२) संस्थेच्या सदस्याकडून अथवा सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना धमकी देणे/त्यांच्यावर हल्ला करणे; 

३) पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या इतर कोणत्याही बाबी.

प्रश्न क्र. ४९) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी सर्वसाधारण सभेत कराव्यात ?

उत्तर: 

१) संस्थेच्या मालमत्तेची देखभाल व्यवस्थापन समितीकडून न होणे 

२) संस्थेच्या दर्शनी भागावर फलक न लावणे 

३) संस्थेच्या सदस्यांकडून उपविधी मधील तरतुदींचे पालन न झाल्यामुळे अशा कृतीसाठी व्यवस्थापन समितीने आकारलेला जादा दंड 

४) उपलब्ध मोकळ्या जागेचा कायदेशीर वापर करण्यास व्यवस्थापन समितीचा विरोध 

५) व्यवस्थापन समितीकडून संस्थेच्या मालमत्तेचा विमा न काढणे 

६) वास्तुशास्त्रज्ञाची नेमणूक 

७) सर्वसाधारण सभेच्या अखत्यारितील इतर बाबी.

प्रश्न क्र. ५०) कोणत्या स्वरूपाच्या तक्रारी संघाकडे कराव्यात ?

उत्तर: 

१) सदस्यांकडून संस्थेच्या सचिवास प्रवेश नाकारणे 

२) सदस्य/व्यवस्थापन समिती यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार न स्वीकारणे 

३) संबंधित जिल्हा/सहायक निबंधकांनी दिलेल्या निर्देशानुसार उपविधी क्र. ९६ अन्वये विशेष सर्वसाधारण सभा बोलाविणे आणि उपविधी क्र. १३२ अन्वये व्यवस्थापन समितीची सभा बोलविणे. 

४) संघाच्या उपविधीच्या तरतुदीनुसार यासारख्या इतर बाबी.

मागील लेखाबाबत अथवा आपल्या प्रश्नाबाबत अधिक माहितीसाठी खालील इमेलवर संपर्क साधू शकता.

vishal@vlawsolutions.com

(ॲड. व्ही लॉ सोल्युशनस चे संस्थापक आहेत)



दिगंबर वाघ             

कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


  🙏  एक वचन तीन नियम  🙏

) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा