१०६ कष्टकरी कामगार यांना पुरस्काराचे वितरण

देशाच्या विकासात कामगारांच्या कष्टाचा मोठा वाटा - कामगार मंत्री दिलीप वळसे- पाटील

गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मुंबई प्रतिनिधी :  कामगार बंधूंच्या हातामध्ये नवनिर्माणाची प्रचंड मोठी शक्ती असून देशाच्या व पर्यायाने  राज्याच्या विकासात कामगारांच्या कष्टाचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री दिलीप वळसे, पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाद्वारे आयोजित 33 व्या गुणवंत कामगार पुरस्कार वितरण प्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी  राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंघल,  कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर,विकास आयुक्त पंकज कुमार,कल्याण आयुक्त रविराज इळवे आदी उपस्थित होते.

       पुरस्कार मिळालेल्या सर्व कामगार बंधू भगिनींचे स्वागत,अभिनंदन करून कामगार मंत्री वळसे-पाटील म्हणाले, कामगारांनी केलेल्या चांगल्या कामाची नोंद घेऊन, त्यांचा गौरव करण्याचे महत्त्वाचे काम कामगार विभागामार्फत होत आहे. पुरस्कारप्राप्त गुणवंत कामगारांनीही यापुढे भविष्यात उत्तम काम करावे. प्रगतीकडे झेपावण्याचे काम कामगारांमार्फत होते.कामगार क्षेत्राने आपल्याला उत्तम साहित्यिक, उत्तम विचारवंत व उत्तम खेळाडू दिले आहेत. अशा आपल्या गुणवंत कामगार पुरस्कार मिळालेल्या सर्वांना विशेष कार्य अधिकारी हे पद देण्यात येते. त्याचाही लाभ या सर्वांना मिळेल.

         आपल्याकडे 10 टक्के संघटित व 90 टक्के असंघटित कामगार आहेत. असंघटित कामगारांना मदत मिळावी. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघटितपणे काम करणे आवश्यक असल्याचे वळसे- पाटील यांनी सांगितले. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पुण्यतिथीच्या औचित्याने हा कार्यक्रम दरवर्षी 9 फेब्रुवारीला घेतला जातो. हुतात्मा बाबू गेनू यांच्या कार्याची महतीही वळसे-पाटील यांनी विषद केली. कामगारांच्या संदर्भातील अडीअडचणी, त्यांच्या समस्या त्यांना करावयाची मदत यासंदर्भात विभागाने अग्रक्रमाने काम करावे असेही निर्देश वळसे-पाटील यांनी  दिले.

कामगारांमुळे व्यवस्था सुव्यवस्थित - राज्यमंत्री बच्चू कडू

         कष्टकरी शेतकऱ्यांच्या हाताइतकेच महत्त्व कामगारांच्या हाताला असून त्यांच्यामुळे अनेक व्यवस्था या सुव्यवस्थित राहतात. कामगारांचे हात हे महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कामगार विभाग सक्षमपणे काम करेल. पुरस्कार मिळालेल्या सर्व गुणवंत कामगारांचे अभिनंदन करीत ‘तुम्ही असेच पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशा शब्दात त्यांनी पुरस्कारप्राप्त गुणवंतांचा गौरव केला. कामगारांच्या अडीअडचणी सोडविणे, नवीन होणारे कायदे तसेच कामगार कार्यालय सुधारणे, या बाबींवर भर देण्यात येत असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले.

106 पुरस्काराचे वितरण

      महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम 1953 अंतर्गत मंडळाकडे नोंदणी असलेल्या आस्थापनात काम करणाऱ्या त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, संघटन या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगार व कर्मचारी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यावेळी 2015 चा कामगार भूषण पुरस्कार महेश यशवंत सेवलीकर, बजाज ऑटो, औरंगाबाद तर 2017 चा पुरस्कार विजय भूपाल पिसे, किर्लोस्कर ब्रदर्स, पलूस जिल्हा सांगली यांना देण्यात आला. 2015 मधील 51 व 2017 मधील 53 कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करण्यात आले. व्यासपीठावर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचेही पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते श्रमकल्याण युग या गुणवंत कामगार पुरस्कार विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

         कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कोरोना काळात व त्यानंतर कामगार मंडळाने केलेल्या कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी केलेल्या कामांची माहिती देऊन कार्यक्रमास व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना साठे यांनी तर आभार प्रदर्शन सहायक कल्याण आयुक्त माधवी सुर्वे यांनी केले.  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी मर्यांदित लोकांना प्रवेश देण्यात आला. तथापी, सोहळ्याच्या आनंदापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण युट्युब आणि फेसबुकद्वारे करण्यात आले.

दिगंबर वाघ

     कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८


        🙏  एक वचन तीन नियम  🙏

  १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा