कोविड रुग्णांना बेड व रुग्णवाहिका मिळेल याची काळजी घ्या, राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे
कळंबोली येथील कोविड समर्पित आरोग्य केंद्राचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
कल्याण प्रतिनिधी विनायक चव्हाण : कोविडच्या प्रसाराचा वेग गतवर्षीपेक्षा दुप्पट असल्याने कोविडचे संकट मोठे झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कोविड रुग्णांना उपचारासाठी बेड व रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आवश्यक त्या सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. पनवेल येथील कळंबोली येथे सिडकोने उभारलेल्या कोविड समर्पित आरोग्य केंद्राचे लोकार्पण व पनवेल महापालिकेकडे हस्तांतरण आज ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले, त्यावेळी शिंदे बोलत होते.
या कार्यक्रमाला पनवेल येथे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक कैलाश शिंदे, पनवेलच्या महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोविडच्या रुग्णसंख्येत मोठ्या झपाट्याने वाढ होत आहे, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. सिडकोने हे रुग्णालय उभारुन चांगले काम केले आहे. या रुग्णालयाची गरज भासणार नाही असे वाटले होते मात्र दुर्देवाने कोविडची दुसरी लाट आली आहे. कोविड रुग्णांसाठी आणखी सुविधा उभारण्याबाबत विचार सुरु असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रितपणे काम करुन या संकटावर मात करण्याची गरज आहे व नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले.कोविड रुग्णालयांसाठी डीपीडीसीच्या माध्यमातून अधिक निधी देण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगला प्रतिसाद दिला, असे ते म्हणाले. कोविडशी लढताना काहीही कमी पडू नये यासाठी आवश्यकतेप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहेत. ज्या सोयीसुविधा कमी पडत असतील तर त्या त्वरित पुरवण्यासाठी सर्व आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. सिडको, नगरविकास विभागाच्या माध्यमातून महापालिकेला सर्व मदत केली जाईल, नागरिकांनी देखील दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. सिडकोने चांगल्या पध्दतीने रुग्णालय उभारले असून ठाण्यात देखील सिडकोने कोविड रुग्णालय उभारण्यास सहकार्य केले होते, अशा शब्दांत शिंदे यांनी सिडकोचे कौतुक केले.
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, पनवेल महापालिका हद्दीत कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले त्यामुळे हे रुग्णालय रुग्णांच्या सेवेत रुजू होऊ शकले. सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाचा लाभ पनवेल व परिसरातील कोविड रुग्णांना होईल. कोविड संपल्यानंतर हे रुग्णालय सर्वसामान्य रुग्णालय म्हणून वापरले जावे अशी मागणी तटकरे यांनी केली. या रुग्णालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण बरे व्हावेत व घरी जावेत अशी सदिच्छा आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी प्रास्ताविकात रुग्णालय उभारणीबाबत माहिती दिली.
रुग्णालयाविषयी अधिक माहिती
पनवेल महापालिका क्षेत्राकरिता कळंबोळी प्लॉ़ट क्रमांक १, सेक्टर ५ ई येथे सिडकोच्या इमारतीत कोविड समर्पित रुग्णालय सिडकोने उभारले आहे. यामध्ये तळमजल्यावर १२ खाटांचा अतिदक्षता कक्ष, पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर प्रत्येकी ३० खाटा या प्रमाणे वैद्यकीय ऑक्सिजनसह एकूण ६० खाटा अशआ एकूण ७२ खाटांची व्यवस्था आहे.अतिदक्षता कक्षात आवश्यक ती सर्व उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे ५ व्हेंटिलेटर असून प्रत्येक व्हेंटिलेटरमध्ये ह्युयुनिफाईयरची व्यवस्था आहे. त्यामुळे आवश्यक त्या वेळेला एचएफएनसी मोडमध्ये वापरता येईल. सदर व्हेंटिलेटरमध्ये सी पॅप व बाय पॅप मोड उपलब्ध आहे. सदर व्हेंटिलेटर मोठी माणसे व लहान मुलांसाठी वापरता येतील. प्रत्येक अतिदक्षता खाटेसाठी ५ पॅरामीटर मॉनिटर असून त्यात रिचार्च करता येईल अशी बॅटरी देण्यात आली आहे. याशिवाय सिरींज पंप, ईफ्युजन पंप, ऐबीजी मशीन, १२ चॅनल ईसीजी मशीन, डिफ्रेब्रिलेटर आदी आवश्यक उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. संपूर्ण रुग्णालयात पाईपद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी तळमजल्यावर प्रत्येकी २०० लीटर क्षमतेचे ४ ड्युरा सिलेंडर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील रुग्णाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय उपकरणे व साहित्य, वैद्यकीय प्राणवायू सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. रुग्णालयासाठी वैद्यकीय फर्निचर, वैद्यकीय लिनन आवश्यक प्रमाणात देण्यात आले आहे.