मोहफुलांवर प्रक्रिया उद्योग करून त्यापासून बनवलेले पौष्टिक लाडू, बिस्किटांचा शालेय पोषण आहारात समाविष्ट करण्याची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची सूचना
स्टॉबेरी, ड्रॅगनफ्रुट लागवडीसह जांभळापासून मधुमेहावरील औषध बनवण्याच्या प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन द्या..
ड्रॅगनफ्रुट, स्ट्रॉबेरी सारखी जास्त उत्पन्न देणारी उत्पादने घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करा व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करा, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच कर्जत येथील शेखर भडसावळे यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या प्रकल्पाचा अभ्यास करुन त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. धान्य साठवणुकीसाठी लागणाऱ्या गोडाऊन्सची क्षमता वाढवण्यासाठी जिल्ह्यात १३ गोडाऊन उभारणीसाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन निधीतून देण्यात आलेला आहे. त्याचा आढावा घेऊन हे काम लवकर पूर्ण होईल याकडे लक्ष देण्याची सूचनाही शिंदे यांनी यावेळी केली. पीक विमा योजनेत सध्या ३४ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी केली.तेलगंणा मधून गडचिरोली मध्ये खते आणणे सोयीचे आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेऊन येणारी अडचण सोडवण्याची तयारी पालकमंत्र्यांनी यावेळी दाखवली. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाची बी बियाणे उपलब्ध करुन देणे, जिल्ह्यातील सेंद्रीय शेतीचं प्रमाण वाढवून गडचिरोली जिल्ह्याला 'सेंद्रीय शेतीचा जिल्हा' अशी ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.
कृषी विभागातील प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी कृषी मंत्र्यांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. त्यासोबतच जिल्ह्यातील रिक्त पदांचा विषय लवकरात लवकर सोडवण्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला आश्वस्त केले.