गोसेखुर्द प्रकल्प पूरनियंत्रण करण्यासाठी आंतरराज्यसह सर्व यंत्रणांनी सुयोग्य समन्वय साधावा - जलसंपदा मंत्री जयंत पाटील
पुनर्वसनाचे प्रश्न लवकरच मार्गी – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पुर्ण होऊन त्याचा लाभ संबंधितांना होईल. गोसेखुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी लावण्यात येतील, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच विभागाने 116 नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून त्याची प्रक्रिया पुर्ण होत आली आहे. त्यातून 40 बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहे. आपत्ती काळात प्रशिक्षित टिम तालुकास्तरावर ठेवण्याबाबतची सूचना चांगली असल्याचे ते म्हणाले. योग्य समन्वय आवश्यक
- सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी महत्वाच्या सूचना केल्या. यात प्रामुख्याने मेडीगड प्रकल्प, संजय सरोवर तसेच तेलगंणा राज्याच्या धरणातील पाणी सोडताना व थांबविताना आपल्या राज्याच्या प्रशासनाला विश्वासात घेऊन कार्यवाही करावी. ज्यामुळे व्यवस्थित नियोजन करता येईल. गतवर्षीसारख्या अडचणी निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे श्री.शिंदे यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधींच्या सूचना
खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा शहरासाठी असलेल्या पूरनियंत्रण भिंतीबाबतचे प्रश्न, तेथील पुनर्वसनाचे प्रश्न यात येणाऱ्या अडीअडचणी तातडीने सोडविण्याविषयी सूचना केली. याबाबतचे नियोजन करुन हे प्रश्न सोडविल्यास संभाव्य धोका टळू शकेल, असे सांगितले. खासदार कृपाल तुमाने, खासदार सुनील मेंढे यांनीही मागच्या वेळी झालेले नुकसान पाहता तात्काळ पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागावे, अशी सूचना केली.आमदार सर्वश्री नाना पटोले, ॲड.आशिष जैस्वाल, नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, राजू पारवे, ॲड.अभिजित वंजारी यांनीही संबंधित भागातील पुनर्वसन, नुकसान भरपाई, संभाव्य नियोजन, अडीअडचणी याबाबत महत्वपूर्ण सूचना केल्या. या बैठकीस जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सचिव (प्रकल्प समन्वयक) तथा कृष्णा खोरे कार्यकारी संचालक टी.एन. मुंडे, कार्यकारी संचालक आर.डी. मोहिते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.