अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने समृध्दी महामार्गाला जोडणारा जालना- नांदेड द्रुतगती महामार्ग मंजूर केला असून, त्यासाठी भू-संपादनाची प्रक्रिया सुरु करण्यासाठी अधिसूचना काढण्याचा प्रस्ताव शासनास सादर झाला आहे. या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीतून मुंबई- नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्पाला जालना- नांदेडपर्यंत वाढवता येणे शक्य आहे. हाच मार्ग पुढे नांदेडवरून हैद्राबादपर्यंत विस्तारित करण्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करता येईल. त्यामुळे मुंबई- हैद्राबाद प्रवासासाठी पुणे-सोलापूर मार्गे आणि औरंगाबाद-नांदेड मार्गे असे दोन पर्याय उपलब्ध होतील या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मुंबई- औरंगाबाद- जालना- नांदेड- हैद्राबाद असा बुलेट ट्रेनचा मार्ग हाती घेण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा. तसेच या प्रस्तावात मुंबई- औरंगाबाद- नांदेड टप्प्यासाठी समृध्दी महामार्गातून जमीन उपलब्ध करुन देत आहोत, असेही नमूद करावे. जेणेकरून मुंबई- औरंगाबाद- नांदेड असा बुलेट ट्रेनचा प्रकल्प तात्काळ मार्गी लागेल, असे चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.