गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांनी
मुख्यमंत्री संकल्प कक्षास सूचना पाठविण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन
ईमेलवर सूचना पाठवा
दूर्गप्रेमीना दूर्ग संवर्धनाच्या दृष्टीने काही सूचना करावयाच्या असतील तर त्यांनी त्या cmsankalpkaksha@maharashtra.gov.in या मुख्यमंत्री सचिवालयाच्या संकल्प कक्षाला पाठविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ते म्हणाले की, दूर्ग संवर्धनात आपण आजपर्यंत केवळ अडीअडचणींचा पाढा वाचत होतो पण आता तसे होणार नाही. या अडचणींवर मार्ग काढून पुढे कसे जायचे ते या क्षेत्रातील तज्ञ मंडळीनी एकत्र बसून ठरवावे व किल्ल्यांच्या संवर्धनाचा सर्वंकष आराखडा तयार करावा, राज्य शासन यामध्ये पूर्ण सहकार्य करेल.
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपा
गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता आपल्याला हे काम करावयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी परत एकदा स्पष्ट केले.गड किल्याचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्याचा आपला विचार असून हळूहळू यात इतर किल्ल्यांचाही समावेश करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात तोरणा, शिवनेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुधागड या किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे नियोजन असून दुर्गप्रेमी आणि अभ्यासकांचा सहभाग असलेली एक मध्यवर्ती समिती स्थापन करून सर्वांच्या सूचनांचा विचाराने आराखडा तयार करायला लागा असेही मुख्यमंत्री म्हणाले. गडकिल्ल्यांचे संवर्धन करणार म्हणजे नक्की काय करणार आणि त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवून ते कसे करायचे त्याचा पहिले सविस्तर विचार करा. जगभरात शिवरायांच्या या गडकिल्ल्यांची महती पोहचेल यासाठी उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे, ड्रोनसारख्या साधनांचा उपयोग करून केलेल्या व्हिडीओ क्लिप्स विविध माध्यमांतून जगभर पोहचेल असे पाहिले पाहिजे. गड किल्यांच्या पायथ्याशी परिसरात त्या किल्ल्याविषयी संपूर्ण माहिती देणारे केंद्र किंवा संग्रहालय उभारणे, केंद्र व राज्याकडील किल्ल्यांची वर्गवारीनुसार संवर्धनाचे नियोजन करणे, किल्ल्यांच्या परिसरातील जैवविविधता, निसर्ग, प्राणी- पक्षी यांची देखील जपणूक तितकीच महत्वाची असून त्याविषयीही पर्यटक आणि संशोधक यांना आकर्षक स्वरूपात उपयुक्त माहिती मिळणे गरजेचे आहे असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यावेळी दूर्गप्रेमींनी आपल्या सूचना मांडतांना दुर्गांचे राज्य सरकारने अधिग्रहण करावे, पर्यटन, पुरातत्व, वन विभाग यांच्यात अधिक समन्वय असावा, दुर्ग संवर्धन विभाग सुरु करावे, दुर्गांसाठी सहाय्यता निधी सुरु करावा अशा अनेक सूचना केल्या
यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींचीहि उपस्थिती होती.