"डॉक्टर्स आर्मी", "फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर " * या संकल्पनांची देशात वाहवा ! -महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
कोविडच्या दुस-या लाटेनंतर आता महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडयुलर ओटी सुरु होणार असून सर्व शस्त्रक्रिया तिथे करण्याचा आमचा प्रयत्नआहे. वसंतव्हॅली, शक्तिधाम, विठ्ठलवाडी आणि रुक्मिणी प्लाझा या 4 ठिकाणी आता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेची 16 नागरी आरोग्य केंद्रे असून आता नागरिकांच्या सेवेसाठी सध्या एकुण 25 आणि भविष्यात 36 नागरी आरोग्य केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत डायलेसिस सेंटरही सुरु केली जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली. कोविड कालावधीत वैदयकीय क्षेत्रातील सर्वांनी एकत्र येवून काम केल्यामुळे कोविडवर नियंत्रण ठेवणं शक्य झालं, याचं श्रेय सर्व डॉक्टरांसमवेत आयुक्तांचंही आहे, आयुक्तांनी सर्वांना विश्वासात घेवून एकत्र काम केलं, पुढेही ही एकी कायम राहील असे उद्गार आयएमए डोंबिवलीच्या अध्यक्षा डॉ. भक्ती लोटे यांनी आपल्या भाषणात काढले.
कोविडच्या पहिल्या लाटेत सर्वांनी मिळून हे काम केले, ते ऐतिहासिक आहे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यामुळे खाजगी डॉक्टर्स, महापालिकेशी जोडले गेले आणि त्यामुळेच डॉक्टर्स आर्मी स्थापन झाली, अशी माहिती आयएमए कल्याण चे अध्यक्षडॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली. आयुक्तांच्या नावातच विजय आहे, त्यामुळे आता 3 री लाट जरी आली तरी आपल्या सर्वांच्या मदतीनेच त्यातून सहीसलामत बाहेर पडू, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले.कोविड कालावधीत चांगले इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहीले आणि कोविड गेल्यावरही नागरिकांच्या सेवेसाठी ते कायम राहील.डॉक्टर्स,इंजिनियर्स व इतरांनी मिळून काम केल्यामुळे आपण कोविडवर विजय मिळवू शकलो, असे उद्गार शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी आपल्या भाषणात काढले. कार्यक्रमाचे प्रास्तविक वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले. या कार्यक्रमात महापालिकेचे डॉक्टर्स, आयएमए,कॅम्पा, निमा, होमिओपॅथिक इ. वैदयकीय संघटनांच्या पदाधिका-यांचा व कोविड काळात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करणाऱ्या इंजिनिअर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांचे हस्ते तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला.
आजच्या डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ऑपरेशन थिएटर, ओपिडी इ. सुविधांयुक्त प्रसुतिगृह वसंत व्हॅली येथे आज सुरु करण्यात आले आणि एक बाळंतपणही सुखरुपरित्या पार पडले.