वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी सन 2017 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला होता. या करारानुसार तीन वर्षासाठी सर्व कर्मचारी तसेच आवश्यक ती यंत्रसामुग्री उपलब्ध करण्यात आली होती. आता हा करार जरी संपला असला तरी नवीन करारासंदर्भातील प्रस्ताव त्वरित पाठविण्यात यावा आणि प्रस्तावाला परवानगी मिळावी यासाठी अधिष्ठाता यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांकडे पाठपुरावा करावा असे निर्देश देशमुख यांनी दिले.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बांधकाम कामाला गती देण्यात यावी - पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
दीड वर्षापासून राज्यात कोविडचे संकट सुरु असून अजूनही धोका टळलेला नाही. जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविड रुग्णालय करण्यात आले होते तसेच येथील डॉक्टर आणि इतर कर्मचारी कोविडच्या कामात होते. मात्र आता हळूहळू या महाविद्यालयात करण्यात येणाऱ्या इतर बांधकाम कामाला गती देण्यात यावी अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केल्या. पाटील म्हणाले की, या महाविद्यालयात बांधकाम करण्यात येणाऱ्या कंत्राटदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकामासाठी आवश्यक त्या तांत्रिक परवानग्या, प्रशासकीय मान्यता घेण्याचे काम वेळेत पूर्ण करावे तसेच या बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत परवानग्या घेऊन बांधकामाला गती द्यावी. हे बांधकाम वेळेत पूर्ण होण्यासाठी जळगाव येथे लवकरच साईट ऑफीस सुरु करण्यात यावे, असे निर्देशही पाटील यांनी दिले.