महामंडळाने हिवाळी पर्यटन आणि दीपावली सुट्यांसाठी नवनव्या संकल्पना राबविण्याची जोरदार तयारी केली आहे. पर्यटकांसाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. जेष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी यांना आगाऊ बुकिंगसाठी सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपताना आजी–माजी सैनिक आणि दिव्यांगांसाठी विशेष सवलती दिल्या आहेत. ग्रुप बुकिंगमध्ये 20 खोल्यांपेक्षा जास्त बुकिंग असल्यास सवलत देण्यात येत आहे. शालेय सहलींसाठीही विशेष सवलती देण्यात येत आहेत. याबरोबरच काही नाविन्यपुर्ण निर्णय घेताना महामंडळाने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून 'कॉम्लीमेंटरी ब्रेकफास्ट' ची सुरवात केली असल्याने पर्यटक आनंद व्यक्त करीत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता महामंडळाच्या पर्यटक निवासात पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. येणाऱ्या पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पर्यटकांच्या मागणीवरून पर्यटक निवासात औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर अशी व्यवस्था पुर्वीपासूनच करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून 'प्री–वेडींग फोटोशूट' आणि 'डेस्टीनेशन वेडींग'चीही सोय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या वेबसाईटर ऑनलाईन आरक्षणही सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येणार असून पर्यटकांसाठी 'कॉम्प्लीमेंटरी ब्रेकफास्ट'सह नाविन्यपूर्ण अशा 'वर्क फ्रॉम नेचर' आणि 'वर्क विथ नेचर' या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वायफाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. अशा विविध सोयी सुविधांसह पर्यटकांच्या स्वागतासाठी महामंडळ सज्ज असल्याने पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.