मतदार नोंदणीसाठी महिलांनी पुढे यावे - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
देशपांडे म्हणाले की, जास्तीत जास्त महिलांची मतदार नोंदणी करण्याकरिता त्यांच्यापर्यंत संदेश घेऊन जाणे आवश्यक आहे. नवविवाहितेचे नाव तिच्या सासरकडील मतदार यादीत होण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करण्यात यावा. मतदार यादीत महिलांना नाव नोंदणी करावयाची आहे, ही माहिती जर एका महिलेपर्यंत गेली तरी ती सर्व कुटुंबापर्यंत जाते. नाव नोंदणीची प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यात आली आहे. दिनांक 13 व 14 नोव्हेंबर आणि 26 व 27 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरे घेण्यात येत असून दिनांक 16 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात येणार असल्याची माहिती देशपांडे यांनी दिली.राज्यातील नवमतदार, तृतीयपंथी तसेच दिव्यांगांचे नाव मतदार यादीत समाविष्ठ होण्यासाठी आवश्यक ती लागणारी सर्व मदत उमेदमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसेकर यांनी यावेळी दिली.