विलंबाला प्रतिबंध घालण्यासाठी दफ्तर दिरंगाई कायदा महत्त्वाचा आहेत ?

संपादकीय,
    माहिती अधिकार कायदा प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने "अभिलेख व्यवस्थापन' व "दफ्तर दिरंगाई' असे दोन महत्त्वपूर्ण कायदे 2006 साली संमत केले. शासकीय कर्मचाऱ्यांकडून कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध घालण्यासाठी दफ्तर दिरंगाई कायदा महत्त्वाचा ठरला. त्यात अकारण विलंब करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे. पण, या कायद्याची शासकीय कार्यालयांमध्ये अंमलबजावणीच होत नसल्याचे चित्र असून दप्तर दिरंगाई कायदा केवळ कागदावरच शिल्लक असल्याचे भासते. माहिती अधिकार कायदा अस्तित्वात असला तरी प्रारंभी अधिकाऱ्यांकडून "सदरहू कागदपत्रे आढळत नाही' असे पर्वणीतील उत्तर देऊन अंग काढून घेण्याचा प्रयत्न केला जायचा. यावर प्रभावी उपाय म्हणून अभिलेख व्यवस्थापन कायदा आणला गेला. कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय कार्यालय किंवा विभागात अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत नागरिकांची सनद तयार करून प्रसिद्ध करण्याची अटक आहे. त्यात सेवा व सुविधेसह कालमर्यादेचाही उल्लेख असणे अभिप्रेत आहे. नागरिकांच्या सनदेमध्ये नमूद कालावधीत अंतिम निर्णय न झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करता येते.

    नियमानुसार शासकीय काम तत्काळ पूर्ण करणे अभिप्रेत असून साधारणपणे कोणतीही फाईल सात कामाच्या दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येत नाही. दुसऱ्या कोणत्याही विभागाकडे विचारार्थ पाठवायची आवश्‍यकता नसलेल्या फाईलीच्या संबंधात 45 दिवसांच्या आत निर्णय घेऊन कारवाई करणे आवश्‍यक आहे. हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास तो कर्मचाऱ्यांचा कर्तव्यपालनातील कसूर ठरतो. या कायद्यानुसार कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या बिलंबाला आवर घालण्यासाठी दफ्तर दिरंगाई कायदा आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी बहुसंख्य शासकीय कार्यालयात होत नसल्याचे दिसते. बाबुगीरीवर कारवाई होत नसल्यानेच आजही "सरकारी काम आणि सहा महिने थांब' याचा प्रत्यय नागरिकांना येतो. 

    अभिलेख व्यवस्थापन व दफ्तर दिरंगाई कायद्यांचा योग्य समन्वय साधत नागरिकांनी शासन यंत्रणा अधिक गतिमान, पारदर्शी व उत्तरदायी होण्यासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज आहे. या कायद्यांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने प्रचार व प्रसार करावा.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८