म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ सदनिका व २२० भूखंडांच्या विक्री ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ
* प्रधानमंत्री आवास योजना (नागरी)
औरंगाबाद मंडळाच्या सोडतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (नागरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३३८ सदनिका आहेत. यामध्ये लातूर एमआयडीसी येथे ३१४ सदनिका सिरसवाडी रोड जालना येथे १८ सदनिका औरंगाबाद येथील नक्षत्रवाडी येथे ६ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
* म्हाडा गृहनिर्माण योजना
म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी भोकरदन (जि. जालना) येथे २७ भूखंड व २ सदनिका अंबड (जि. जालना) येथे ६ सदनिका, सिरसवाडी रोड, जालना येथे ३८ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) सोडतीत भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, हिंगोली येथे १६ सदनिका, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे ५३ भूखंड, औरंगाबाद येथील गृहनिर्माण भवनाजवळ ४ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे १९ भूखंड सोडतीत उपलब्ध आहेत.सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ९ भूखंड, कन्नड (जि. औरंगाबाद) येथे ६ सदनिका, हिंगोली येथे ३५ सदनिका, परभणीतील गंगाखेड रोड येथे २५ सदनिका व ३४ भूखंड, उस्मानाबाद एमआयडीसी एरिया येथे ५ सदनिका, चिखलठाणा (औरंगाबाद) येथे ३९० सदनिका, सेलू (जि. परभणी) येथे २ भूखंड, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे १ गाळा, नवीन कौठा (जि. नांदेड) येथे १ सदनिका, नळदुर्ग (जि. उस्मानाबाद) येथे ५९ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उच्च उत्पन्न गटासाठी (High Income Group) भोकरदन (जि. जालना) येथे ७ भूखंड, टोकवाडी (ता. मंठा, जि. जालना) येथे १ भूखंड, बन्सीलाल नगर येथे १ सदनिका उपलब्ध आहेत. तसेच सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून या गटासाठी पैठण (जि. औरंगाबाद) येथे २१ सदनिका, देवळाई (जि. औरंगाबाद) येथे ३९ सदनिका उपलब्ध आहेत.
* २० टक्के सर्वसमावेशक योजना
२० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटासाठी काळे इस्टेट, इटखेडा, ता. जि. औरंगाबाद येथे ३१ सदनिका तर देवळाई (जि. औरंगाबाद) येथे २३ सदनिका सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.औरंगाबाद मंडळाच्या या सोडतीतील इच्छुक अर्जदारांचे अर्ज सादर करतेवेळी दि. 1 एप्रिल २०२१ ते दि. ३१ मार्च २०२२ या १२ महिन्यांच्या कालावधीतील सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार कालावधीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (EWS) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार रुपये पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न २५ हजार १ रुपये ते ५० हजार रुपयापर्यंत असावे तसेच मध्यम उत्पन्न गटासाठी (MIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ५० हजार १ रुपये ते ७५ हजार रुपयापर्यंत असावे. उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न ७५ हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत ५ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटाकरीता १० हजार रुपये, तर मध्यम उत्पन्न गटातील अर्जदाराला १५ हजार रुपये, उच्च उत्पन्न गटातील अर्जदाराला अर्जासोबत २० हजार रुपये व सर्व उत्पन्न गटातील अर्जदाराला १० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. सोडतीनंतर यशस्वी अर्जदार वगळून इतर सर्व अर्जदारांच्या अनामत रकमेचा त्यांच्या खात्यामध्ये परतावा केला जाणार आहे. तसेच या सोडतीकरिता रु. ५९० रुपये प्रति अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाकडे पारदर्शक संगणकीय सोडतीची एकमेव प्रक्रिया आहे याव्यतिरिक्त म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. सोडत प्रक्रियेबाबत अथवा सदनिका मिळणेबाबत अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तींशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास औरंगाबाद मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही असे आवाहन औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्याकरिता आणि संगणकीय सोडत प्रणालीच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याकरिता सन २००९ पासून उच्चस्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे. कोंकण मंडळाच्या २०२१ च्या सोडतीसाठी देखील त्रिसदस्यीय उच्चस्तरीय देखरेख समिती कार्यरत आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली.