मुंबई प्रतिनिधी : राज्य पोलीस दलाच्या सायबर युनिटमधील यंत्रणा अद्ययावत असून मनुष्यबळ देखील प्रशिक्षित आहे. तथापि, आधुनिक तंत्रज्ञान हे सतत बदलत असल्याने या क्षेत्रातील तज्ज्ञ कंपन्यांच्या सेवा घेवून सायबर युनिट अधिक सक्षम करण्यात येईल, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. येत्या काळात राज्यातील सायबर शाखेत गुप्तचर यंत्रणा तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सदस्य डॉ.मनिषा कायंदे यांनी यासंबंधी लक्षवेधी सूचना मांडली होती.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले नागरिकांचे दैनंदिन आर्थिक, व्यावसायिक व्यवहार हे ऑनलाईन माध्यमातून होण्याच्या प्रमाणात झालेली वाढ व सोशल मीडियाचा वाढता वापर या कारणांमुळे सायबर गुन्ह्यांतही वाढ झाली आहे. या गुन्ह्यांना भौगोलिक कक्षा नसल्याने हे मोठे आव्हान असते. गुन्हेगार नवनवीन तंत्राचा वापर करतात. त्यांना रोखण्यासाठी राज्याचे सायबर युनिट सक्षम आहे. तथापि, बदलत्या तंत्रज्ञानासोबत अद्ययावत राहण्यासाठी तज्ज्ञ कंपन्यांचीही मदत घेतली जाईल.
सायबर गुन्ह्यांना बळी पडू नये यासाठी नागरिकांनी देखील दक्ष राहणे आवश्यक असून यासाठी शासनाबरोबरच सोशल, डिजिटल, इलेक्ट्रॉनिक आदी माध्यमांतून जनजागृती होणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. सिनेमा क्षेत्रात होणारी पायरसी रोखण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. विवाह जुळवून देणाऱ्या संकेतस्थळांनी तेथे दिली जाणारी माहिती खरी असेल, जेणेकरून त्या माध्यमातून फसवणूक होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.तसेच वेळोवेळी नागरिकांना अवगत करण्यासाठी यासंदर्भात मार्गदर्शिका प्रसारित करून सायबर गुन्ह्यांबाबत माहिती दिली जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भाई जगताप राजहंस सिंह सचिन अहिर आदींनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८