सामान्य प्रशासन विभागाद्वारे यासाठीचे परिपत्रक जारी
मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात "हॅलो नव्हे - वंदे मातरम्" या अभियानाचा शुभारंभ होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ गांधी जयंतीच्या दिवशी २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने आज प्रसिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यभरात हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य लढ्यातील दिशादर्शक आणि क्रांतीचे निदर्शक असणाऱ्या या गीताच्या सुरुवातीच्या दोन शब्दांनी म्हणजेच "वंदे मातरम्"नी शासकीय कार्यालयातील दूरध्वनी संभाषणाची सुरुवात व्हावी, अशी जनसामान्यांची इच्छा होती. त्यास अनुसरून हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.
‘जनगणमन‘ हे आपले राष्ट्रगीत आणि ‘वंदे मातरम्‘ हे राष्ट्रीय गाणं हे सर्वमान्य झालेले आहे. आजही अनेक शासकीय कार्यालयांत संपर्क साधल्यास अधिकारी व कर्मचारी यांच्या संवादास हॅलो या शब्दाने सुरुवात होते. काही ठिकाणी जय हिंद तर काही ठिकाणी नमस्ते असेही संबोधले जाते. शासकीय कार्यालयातील दूरध्वनीवरून होणारे संवाद व समोरासमोरून आल्यानंतर होणारे संवाद यामध्ये जर "वंदे मातरम्" हा शब्द वापरला तर त्याला एक प्रकारचे राष्ट्रीय स्वरूप येऊ शकते, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
"वंदे मातरम्" हा फक्त नारा किंवा संबोधन नसून राष्ट्रभक्तीचा जाज्वल्य इतिहास आहे. "वंदे मातरम्"बाबत प्रचार-प्रसार व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी या गीताचा इतिहास व त्याच्याशी निगडित घटना यांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. लघु चित्रपटाच्या माध्यमातून "वंदे मातरम्"बाबत जाणीव जागृती करण्यात येणार आहे. “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव"अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांबरोबर निमशासकीय कार्यालये, शासकीय अनुदानित व विना अनुदानित कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत उपक्रम व आस्थापना यांना कार्यालयात दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत व सहकारी यांना संवाद साधण्याच्या सुरुवातीस हॅलो असे न म्हणता "वंदे मातरम्" असे अभिवादन करावे, असे आवाहन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने केले असून, यासाठीची काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे नमूद केली आहेत.
1.सर्व शासकीय कार्यालयांत दूरध्वनीवर / भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा अधिकारी / कर्मचारी यांनी संवाद साधल्यास सुरुवातीचे अभिवादन म्हणून "हॅलो" संबोधन न वापरता, "वंदे मातरम्" म्हणावे.
2. शासकीय कार्यालयांबरोबरच निमशासकीय कार्यालये, शासन सहाय्यित/ अनुदानित / अर्थसहाय्यित व इतर स्वरूपाचे साहाय्य असणारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा/ महाविद्यालये व शैक्षणिक संस्था तसेच शासन अंगीकृत सर्व प्रकल्प/ उपक्रम/आस्थापना येथील कार्यालयांतही दूरध्वनीवर किंवा भ्रमणध्वनीवर अभ्यागत किंवा सहकारी यांनी संवाद साधल्यास, सुरुवातीला "हॅलो" असे न म्हणता "वंदे मातरम्" असे संबोधन करावे. तसेच त्यांनी त्यांच्या वैयक्तिक भ्रमणध्वनीवरही संवाद साधतांना "वंदे मातरम्" असे संबोधन करावे.
3. कार्यालय/संस्था येथे दूरध्वनीवरून होणाऱ्या संवादात सुरुवातीस "वंदे मातरम्" हे संबोधन वापरले जाईल यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी सर्व अधिकारी/कर्मचारी यांना प्रोत्साहित करावे.
4. कार्यालयात/संस्थांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनाही सार्वजनिक जीवनात "वंदे मातरम्" ने संबोधन करण्याबाबत जाणीव जागृती करावी.
5. ज्या ठिकाणी स्वयंचलित दूरध्वनी यंत्रणा अस्तित्वात आहे त्या ठिकाणीही हा बदल करण्यात यावा.
6. विविध बैठका/सभांमध्ये वक्त्यांनी सुरुवात करतांना ती "वंदे मातरम्" या शब्दांनी करावी.
वंदे मातरम् अभियानाची प्रचार आणि प्रसिद्धीसुद्धा करण्यात येणार आहे. "वंदे मातरम्" हे संबोधनात्मक व अभिवादनात्मक स्वरुपात, प्रत्येकाने उच्चारावे यासाठी जाणीव जागृतीही व प्रचार-प्रसार प्रसिद्धीसाठी स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. तरी या अभियानात उत्स्फुर्त सहभाग नोंदवून अभियान यशस्वी करण्याचे आवाहन या परिपत्रकाद्वारे सामान्य प्रशासन विभागाने केले आहे.