सिल्लोड-सोयगाव मधील जलसंधारण प्रकल्पांच्या सीमानिश्चिती खोलीकरण उंची वाढविण्याची प्रक्रिया पूर्ण करावी-कृषिमंत्री अब्दुल सत्तार
मुंबई प्रतिनिधी : निजामकालीन पाणी वितरण व्यवस्था आणि सिल्लोड व सोयगाव या दोन्ही तालुक्यातील जलसंपदा प्रकल्पाबाबतचा जल आराखडा तसेच प्रकल्पसीमा निश्चितीची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ आणि जलसंधारण विभागाला दिले आहेत. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास त्याचा लाभ या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार असून सिंचन क्षमता वाढून हे तालुके पाणीदार होणार आहेत.यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री सत्तार बोलत होते. या बैठकीस गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संजय बेलसरे, औरंगाबाद जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता सुनील कुशिरे आदींची उपस्थिती होती.
सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील अनुक्रमे भराडी, खेळणा, शिवणा, नानेगाव, जंजाळा व खडकपूर्णा या प्रकल्पाच्या दुरुस्तीबरोबरच शिवना आणि भराडी धरणाच्या सीमारेषा निश्चित करुन मार्कींग करण्याची प्रक्रिया नियोजन जलसंपदा विभागाने करावे. खेळणा प्रकल्पाची उंची वाढविण्याची तसेच गाळपेराचा उपसा करुन काढलेला गाळ शेतकऱ्यांना शेतीसाठी उपलब्ध करुन देण्याबाबतची कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.जलसंधारणाच्या प्रस्तावांचा शासनाकडे पाठपुरावा करुन सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल. परिणामी शेतीच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होईल. दोन्ही तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या सर्व प्रकल्पांची मालमत्ता नोंद घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही मंत्री सत्तार यांनी यावेळी दिले.
शेतकरी आत्महत्या येतील नियंत्रणात
सिल्लोड - सोयगाव तालुक्यामधील सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले तर हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. त्यामुळे उत्पन्न चांगले येईल, असा विश्वास कृषिमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.
खोलीकरणाचे दुहेरी फायदे
सिंचन प्रकल्पांचे खोलीकरण केल्यास सिंचन प्रकल्पांची साठवण क्षमता वाढेल आणि तेथील गाळ शेतकऱ्यांना दिल्यास शेती सुपीक होईल असा दुहेरी लाभ सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा होणार आहे. तसेच या भागातील वाहून जाणारे पाणी प्रकल्पांमध्ये वळविल्यास ते प्रकल्प वेळेत भरून जमिनीची सिंचन क्षमता वाढेल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
तत्काळ सर्वेक्षण करून काम सुरू करा
सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे पंधरा दिवसात सर्वेक्षण करून तत्काळ काम सुरू करण्याचे निर्देश कृषिमंत्री सत्तार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. तसेच वन्य प्राण्यांचा होणारा त्रास कशा पद्धतीने कमी करता येईल या संदर्भात सूचना दिल्या.
आत्महत्यांचा कलंक पुसायचाय.....
सिल्लोड -सोयगाव तालुक्यांना लागलेला आत्महत्यांचा कलंक मला पुसायचा आहे. त्यासाठी या भागातील सिंचन क्षमता वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठीच सिंचन प्रकल्पांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा माझा मानस आहे. उत्पादन क्षमता वाढल्याने शेतकरी आत्महत्या नक्कीच नियंत्रणात येतील.