नागपूर विशेष प्रतिनिधी : मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वास्तव्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेला सूचना केल्या आहेत. त्यासाठी दोन वसतिगृह तयार असून पुढील दोन महिन्यांत हस्तांतरणाची कार्यवाही सुरू होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
मुंबईतील केईएम व नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या इमारतींबाबत ॲड. पराग अळवणी यांच्यासह अन्य सदस्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित केला होता.उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, बॉम्बे डाईंग मिल वडाळा येथील संक्रमण शिबिराच्या इमारतीचा ताबा बृहन्मुंबई महानगरपालिकेने एप्रिल 2020 मध्ये कोविड- 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी, विलगीकरण कक्ष म्हणून घेतला होता. सध्या या इमारतीचा वापर विलगीकरण कक्ष म्हणून न होता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसाठी होत आहे. केईएम आणि नायर या दोन्ही रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या निवासासाठी दोन वसतिगृह तयार आहेत. ते लवकरच तेथे स्थलांतरित होतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.