नागपूर विशेष प्रतिनिधी : “उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता एकूण ११६ वाहनांची अनियमित नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले असून ही वाहने संगणक प्रणालीवर ब्लॅक लिस्ट करण्यात आली आहेत. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे”, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभेत आज सदस्य वैभव नाईक यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री देसाई बोलत होते. त्यांनी सांगितले, की उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सन २०१७ ते २०२० या कालावधीत शुल्क व कराचा भरणा न करता ११६ वाहनांची नोंदणी प्रकरणी परिवहन कार्यालयातील एकूण पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच चार खासगी व्यक्तींच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. निलंबित कर्मचाऱ्यांना आयुक्त, परिवहन यांनी सेवेत पुन:र्स्थापित केले आहे. त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भास्करराव जाधव यांनी सहभाग घेतला.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८