मुंबई प्रतिनिधी : ‘कोविड - १९’ मुळे नागपूर येथे दोन वर्षांच्या खंडानंतर विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनासाठी येणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आदी सर्वांच्या निवासव्यवस्थेचे संबंधित सर्व विभागांनी काटेकोर आणि अचूकपणे नियोजन करावे. कोणाचीही कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. हिवाळी अधिवेशनाच्या काळात केलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्याच्यादृष्टीने मोबाईल अॅप तयार करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
मंत्रालयातील परिषद सभागृहात विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२२ च्या प्रस्तावित निवास व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, आहार व्यवस्था, वाय-फाय व्यवस्था, प्रसारमाध्यमांची व्यवस्था आदींचा सविस्तर आढावा मंत्री चव्हाण यांनी घेतला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सो. ना. बागूल मृद व जलसंधारण विभागाचे सहसचिव सुभाष गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार, कार्यकारी अभियंता अभिजित कुचेवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मोबाईल ॲप निर्मितीच्याही दिल्या सूचना
मंत्री चव्हाण यांनी म्हणाले की, दोन वर्षांच्या खंडानंतर अधिवेशन होत आहे. या पार्श्वभूमीवर निवास व्यवस्था तसेच अन्य सर्व व्यवस्था अद्ययावत करुन ते सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी. आवश्यक तेथे डागडुजी करावी. वीज, पाणी, स्वच्छता आदी सुविधा तत्काळ उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. त्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच शीघ्र प्रतिसाद दल कार्यान्वित करावे. निवास व्यवस्थेचे नियोजन करताना अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. मंत्री, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आदींच्या वाहन व चालकांची व्यवस्था तसेच आवश्यक तेथे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी. स्वच्छतेसाठी तैनात कर्मचाऱ्यांची माहिती दर्शनी फलकांवर लावावी. नियुक्त मनुष्यबळ योग्य गणवेशात राहील याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असेही निर्देश मंत्री चव्हाण यांनी दिले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात करण्यात येणाऱ्या सर्व सोयी-सुविधांची एकत्रित माहिती असणारे मोबाईल अॅप तयार करावे. जेणेकरून त्या अॅपवर सर्व माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशा सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.
अपर मुख्य सचिव सौनिक यांनीही विविध सूचना केल्या. अधीक्षक अभियंता नंदनवार कार्यकारी अभियंता कुचेवार यांनी निवास व्यवस्थेबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.