# उर्वरित मच्छीमारांच्या सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावेत–आमदार विनोद निकोले
डहाणू विशेष प्रतिनिधी : 02/10/2022 रोजी डहाणूचे मच्छीमार पाकिस्तानच्या ताब्यात असल्याबाबतचे ईमेल द्वारे प्रशासनाला कळविले होते. तद्नंतर आता त्यांची सुटका होत आहे ही आनंदाची बाब आहे. त्याचे स्वागत असून उर्वरित मच्छीमारांची सुटका करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने विशेष प्रयत्न करावे अशी जोरदार मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी केली आहे.
यावेळी आमदार निकोले म्हणाले की, आदिवासी बांधवांना रोजगार मिळत नाही, म्हणून ते गुजरातच्या मच्छीमार समाजासोबत खलाशी म्हणून काम करत असतात. पण अनवधानाने मासेमारी करताना पाकिस्तानच्या हद्दीत असल्याचा ठपका ठेऊन त्या मच्छीमारांना ताब्यात घेऊन त्यांना डांबून ठेवण्यात येते. हे अतिशय निंदनीय आहे. आपल्या भारत देशातील 666 मच्छिमार पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यापैकी 600 मच्छिमारांची सोडण्याची अधिकृत घोषणा दि. 13 मे 2023 रोजी पाकिस्तान सरकारने केली आहे. नुकत्याच मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार पाकिस्तान सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाकडून जारी केलेल्या पत्रानुसार पहिला गट 11 मे 2023 रोजी 200 मच्छिमार जिल्हा तुरुंग मलिर, कराची येथून वाघा बॉर्डरवर पाठविण्यात येतील. दुसरा गट 02 जून 2023 रोजी 200 मच्छिमार पाठविण्यात येतील तसेच तिसरा गट 100 मच्छिमारांचा 03 जुलै 2023 रोजी पाठविण्यात येईल असे त्यांच्या पत्रात नमूद केले आहे.
यात साधारण 30 मच्छिमार हे पालघर जिल्ह्यातील असून 05 मच्छिमारांना पहिल्या गटात सोडण्यात आले. यात पालघर जिल्ह्यासहित डहाणू व तलासरी येथील विविध पाड्यातील आदिवासी बांधवांचा देखील समावेश आहे अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ. ज.) आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी दिली आहे, आणि त्यांच्या सुटकेचे स्वागत केले आहे.