मुंबई प्रतिनिधी अनुराग पवार : कुठलाही व्यवसाय करायचा म्हणजे त्यासाठी त्याचं ज्ञानअसणं आवश्यक असतं.त्याबद्धल रुची हवी.भांडवल हवं.मी ज्यावेळी प्रकशन व्यवसायात आलो. त्यावेळी मुंबईत पाहिले मौज पॉपुलर परचुरे ढवळे दीपलक्ष्मी धनंजय मॅजेस्टिक अशा मोठमोठ्या प्रकाशन संस्था कार्यरत होत्या. मला साहित्याची आवड सोडून प्रकाशनांची इतर काही माहिती नव्हती.आमचा अंधेरीतील केदार वाचनालयात आमचा साहित्यिक ग्रुप होता.त्यात सतीश काळसेकर बियन चव्हाण,सुरेश चिखले,प्रकाश विश्वासराव चंद्रकांत धर्माधिकारी निरंजन दिवेकर दिलीप वेसावकर शायर गोहर कानपुरी आम्हीं अंधेरी स्टेशन पश्चिमेस असलेल्या रेल्वे रेस्टॉरंटमध्ये नियमित भेटायचो.एक दोन चहा कधी केक तर कधी आम्लेट पाव खात प्रदीर्घ साहित्य चित्रपट संगीत यावर गप्पा व्हायच्या. सुरेश चिखले लिखाण करायचा.पुस्तकं काढण्यासाठी तो अनेक प्रकाशन संस्थेत प्रयत्न करीत होता.पण तिथं ते प्रकाशित करायला पैशांची मागणी व्हायची.
त्यामुळे तो खूप निराश असायचा.आमचा इंजिनियर मित्र दिलीप वेसावकर यांनी ५००० रुपये आम्हाला दिले.आणि आमच्या ग्रुपने ठरवलं की पुस्तकं आपणच काढायचं.ते पैसे आम्हीं आमचा मित्र राजेंद्र पै याला दिले. मराठाच्या शिवशक्तीत राजेंद्र पै आणि जयराज साळगावकर भागीदारीत विक्रम प्रिंटिंग प्रेस चालवीत होते.तिथं ते छापायला दिले. यथावकाश सुरेश चिखले याची गमभन हे कादंबरी तयार झाली. त्याचं मुखपृष्ठ प्रकाश विश्वासराव यांनी केलं होत.आम्हीं उत्साह आणि हौस म्हणून या सर्व गोष्टी करीत होतो.पण पुस्तकं प्रकाशन कस करायच.त्यासाठी सरकारी काही नियम आहेत. सरकारला ते पुस्तकं प्रकाशित झाल्यावर द्यावं लागतं. याची माहिती मिळाली होती.आता याचा प्रकाशक कोणाला करायचं हि चर्चा, विचार सुरू झाला.आणि माझ्या नावावर ते सुरू कराव असं एकमताने ठरलं.आणि मी मीरा प्रकाशन संस्थेचा प्रकाशक म्हणून २६ जानेवारी१९७५ रोजी गमभन हि सुरेश चिखलेची कादंबरी प्रकाशित करून प्रकाशक झालो. त्यावेळेस मला निर्मितीबाबत काही ज्ञान नव्हते.शिरीष पै आणि राजेंद्र पै यांना भेटायला शिवशक्ती मराठात मी नेहमी जायचो.हळूहळू ते ज्ञान मला तिथं थोडं मिळू लागले.
नंतर एकदा आमचे मित्र नारायण बांदेकर यांनी सुनील कर्णिक यांची माझी ओळख करून दिली.वामनमूर्ती मितभाषी सुनील कर्णिक हे लेखन वाचन, संपादन, नवीन पुस्तकांचे विषय सुचवणे प्रुफ तपासणीअशी विविध स्वरूपाची कामे करायचा.आणि मोठमोठ्या साहित्यिकांशी त्याचा परिचय होता. तो त्यावेळी मौजमध्ये काम करीत होता. त्यांची हि ओळख मला प्रकाशनाचे मुद्रणाचे विविध टप्पे जाणून घेण्यास खूप उपयोगी पडले. सुरुवातीला तो माझ्यासाठी पृफे तपासण्याचे काम करायचा.
मी नोकरी करून एक हौस म्हणून प्रकाशन करायचो. कुठलीच साहित्य वातावरण, परंपरा मला नव्हती.पण या साहित्यिक वातवणात मला विलक्षण आनंद मिळायचा.अनेक मान्यवर साहित्यिकांचा सहभाग लाभायचा. त्यांच्याशी चर्चा करता यायची.त्याकाळात सुनील माझा गुरू झाला. पेपरची विवीध साईज न्यूज प्रिंट पुस्तकं प्रिंटिंगसाठी लागणारा व्हाईट पेपर, नेचरल पेपर, चिमणलाल यांचा रंगीत पेपर मुद्रण टाईप मोनो पायका, मौजेचा टाईप त्याची रचना साईज यांचं ज्ञान मला त्यावेळी सुनीलनेचं दिलं.त्यावेळी मी या सर्व कामासाठी त्याच्यावर अवलंबून असायचो. त्याची अनेक दिग्गजांशी होणारी चर्चा मी जवळून पहायचो. त्याचं चौफेर वाचन साहित्यावरील निस्सीम प्रेम वेगवेगळया प्रकारचे विषय सुचवून तो मला नेहमीच मदत करायचा.
सुनिलची मौज ललित नवशक्ती आणि त्यानंतर महानगर आज दिनांक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या सर्व वाटचालीचे टप्पे मी जवळून पाहिले आहेत. तो एका ठिकाणी जास्तीत जास्त वर्षभर राहिला असेल.तिथं तो दीर्घ काळ टिकत नसे. यात त्याचा कुठल्याच बंधनात राहायचं स्वभाव नाही.मुक्तसंचार करता यावा.मनासारखी पुस्तकें वाचता यावीत.मनात सुचलेले पुस्तकांचे प्रकाशनाचे मनसुबे पूर्ण करता यावेत.यासाठी तो अस्वस्थ असायचा.नवनवीन कल्पना सुचली की त्यात भरारी घ्यावी. ती अनेकांना सांगावी.
यामध्ये मोठं मोठे संपादक लेखक मुद्रक चित्रकारांसह अनेक धडपडणाऱ्या माझ्याप्रमाणे ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर रामनाथ आंबेरकर हेमंत रायकर अनिल कोठावळे एक दादरला पेपर पुरवठा करणारे दातरंगे होते. निगेटिव्ह पॉसिटीव्ह करणारा मयूर भिवंडकर असो किंवा चित्रकार कमल शेडगे,सतीश भावसार प्रभाकर भाटलेकर प्रभाकर वाईरकर पुंडलिक वझे,मनोहर बोर्डेकर असोत.अशा विविध लोकांमध्ये अशोक शहाणे,सतीश काळसेकर नवशक्तीचे भाऊ जोशी, निखिल वागळे, युवराज मोहिते, प्रकाश विश्वासराव सुधीर नांदगावकर जाहीरनामा दिवाळी अंक काढणारे धोत्रे,विनायक पडवळ असे मान्यवर लेखक प्रेसवाले आणि प्रकाशन संस्था अशा अनेकांना सल्ले देण्यात तो पुढे असायचा.आणि हे सर्व त्याच्या सुचनांचा विचारपण करायचे. माझ्यामते सुनील एका ठिकाणी दीर्घकाळ टिकू शकला नाही.यांचं कारण मतभेद हे होतंच. त्यांची मते त्याला पटली नाहीत.की हा सरळ राजीनामा देऊन मोकळा व्हायचा.
ललितमध्ये असताना डिंपल पब्लिकेशनचे दहाव्या वर्षात पदार्पण होते. सुनीलने मला एक सल्ला दिला की ललित अंकात दहाव्या वर्षाच्या पदार्पणानिमिताने डिंपल पब्लिकेशनची शुभेच्छा जाहिरात करावी.तुझे पेपरवाले,प्रेसवाले,पुस्तकं विक्रेते आणि हितचिंतकांशी चांगला स्नेह आहे. हे मी जवळून पाहिले आहे.ते हि तुझ्यावर तितकंच प्रेम करतात.त्यावेळी माझ्यात हि हौशी प्रकाशकासारखा सळसळता उत्साह आणि जिद्द होती.की मला वाटलं हि मंडळी आपल्याला शुभेच्छा जाहिरात देतील. अशा आठ दहा शुभेच्छांच्या जाहिराती ललितमध्ये मी मिळवून दिल्या. त्यावेळी आदरणीय केशवराव कोठावळे यांनी ही या जाहिरातीचं कौतुक केलं.पण त्यातील अनेकांनी नंतर एक रुपयाही मला दिला नाही.ते पैसे मला स्वतःलाच भरावे लागले. हा अनुभव मला पुढे उपयोगी पडला.
त्यावेळी कमी बजेटनुसार प्रेस स्वस्त अलिबागला असायचे.त्यावेळी मी अलिबागचे चिंतामणी जोशी,दादा घरत झिराडचे दिनानाथ म्हात्रे यांच्याकडे पुस्तकं छापायचो.त्याची प्रुफे तपासणी सुनील करायचा. एकदा असेच मोहिनी वर्दे यांची पहिली टिझर' कादंबरी झिराडला छापायला दिली होती.इकडे वर्देमॅडमने पुस्तकं प्रकाशन करायचं ठरवलं. ते पावसाळी दिवस होते.तिथले प्रेसवाले शेती करून हा प्रेसचा उद्योग पार्टटाईम करायचे. साधी फोन व्यवस्था हि तिथं नव्हती. प्रेस वाल्यांशी संपर्क हि होत नव्हता.मग मी डॉक्टरांकडे दोन दिवस सुट्टी घेऊन सुनील कर्णिकसह अलिबागला गेलो. त्यावेळी तिथं ट्रेडल मशीनवर हाताने खिळे जुळवून कंपोज करून प्रिंटिंग व्हायचं. पण तिथं कामाला येणारी माणसं सकाळी शेतीत काम करायची.आणि रात्री कंपोज (खिळे) जुळवाजुळव करायला रात्री श्रम परिहार करून यायची.त्यामुळे करेक्शन हि भरभरून निघायची. ते सकाळी प्रुफ रीडिंग करताना सुनीलला काढायला लागायचं. पण इथ एक माणुसकीचा ओलावा मला पाहायला मिळाला.आलेल्या आम्हा दोघां पाहुण्याची जबाबदारी प्रेसवाले म्हात्रेंनी स्वीकारली होती.राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरातच त्यांनी केली होती.
असच सर्व सुर्वे नारायण सुर्वेचं काम पुण्यास चालू होत.सुनील आठ दिवस तिथं मुक्काम करून काम पाहात होता.सुभाष अवचट त्यांचं मुखपृष्ठ करीत होता. पण ते मिळत नव्हत. सुनील तिथं दोन वेळा जाऊन आला. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही.सुनील म्हणाला तू पुण्यात ये.त्याचं हि प्रकाशन मी उत्साहात माधव गडकरी शिरीष पै यांच्या उपस्थितीत करण्याचा कार्यक्रम ठरवला होता.पण मुखपृष्ठ मिळत नव्हतं. त्यावेळी मी,भाऊ पाध्ये आणि नारायण सुर्वे पुण्यास गेलो.सुर्वेना प्रूफे दाखवून ओके घ्यायचं होतं.सुनीलसह आम्हीं सुभाष अवचट यांच्या स्टुडिओत गेलो.त्यावेळी त्यांनी एक सुंदर रंगीत दोन्ही बाजूला चित्र असलेलं मुखपृष्ठ आम्हाला करून दिलं.आम्हीं खूष झालो.त्यावेळी सुनीलने शंका काढली.आपला ग्रंथ ६५० पानांचा झाला आहे.हे चित्र लहान होईल.हे पुस्तकं ४०० पांनांचेअसेल असं आम्ही या आधी सुभाष अवचट यांना सांगितले होते. हे ऐकताच अक्षा असं जोराने सुभाष अवचट मला ओरडला.आणि त्यानं मुखपृष्ठाचे दोन तुकडे करून कचऱ्याच्या पेटीत ते टाकले.वातावरण एकदम सुन्न झालं.सुभाष अवचट यांना वाढलेल्या पानांची कल्पना मी किंवा सुनीलने आधी द्यायला हवी होती.ती आमची चूक होती.आजच्या सारखी स्कॅनिंग व्यवस्था त्यावेळी नव्हती. ते चित्र उपयोगी पडणारे नव्हते.
पण या मोठ्या कलाकाराने आम्हालाच चहा पाजला. स्वतः प्यायला.आणि आम्हाला शांत बसायला सांगून त्यांनी हुबेहूब कचऱ्यापेटीत टाकलेल्या मुखपृष्ठासारखे मुखपृष्ठ करून आम्हाला दिले.भाऊ पाध्ये आणि नारायण सुर्वे यांनी त्याला मिठी मारली.त्यागुणी मोठ्या कलाकाराला आम्हीं सर्वांनी सलाम केला.मी आणि सुनील दादर स्टेशनमध्ये प्रवेश करत असताना आमच्या समोरच विरार ट्रेन निघून गेली. त्यावेळी ४० मिनिटांच्या अंतराने विरार ट्रेन होती. सुनीलला ठाण्याला जायचं होतं. पण हा माझा मित्र माझ्याशी गप्पा मारत पुलावर उभा राहिला.अनेक अवांतर विषय झाले.त्यावेळी तो म्हणाला विजय तेंडुलकर यांची एकसष्ठी येणार आहे.तेंडुलकर यांच्यावर एक पुस्तकं व्हायला हवं.तुझे आणि तेंडुलकर कुटुंबांचे चांगले संबंध आहेत.
भाऊ पाध्ये यांच वासूनाका सांगोपांग नारायण सुर्वे यांच सर्व सुर्वे हे ग्रंथ प्रकाशित केल्या नंतर नवीन पुस्तकं काय करता येईल या शोधात मी होतोच. त्या चर्चेत शिरीष पै आणि प्रिया तेंडुलकर यांनी संपादन केलेला साहित्यातू सत्याकडे या ग्रंथाचा जन्म झाला.आणि त्याचे प्रकाशन विलेपार्ल्याच्या दिनानाथ नाट्यगृहात दिमाखदार सोहळ्यात डॉ.श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले.सुनील कर्णिक आणि डॉ.प्रदीप कर्णिक बंधूंनी मला खूप मोलाची साथ त्याकाळी दिली आहे.याची मला जाणीव आहे.पुस्तकें सुचविणे संपादन करणे प्रुफे तपासणे लेखकांची संवाद साधणे अशा अनेक आघाड्यांवर त्यांनी मला मदत केली आहे.रुपारेल कॉलेजच्या ग्रंथालयात त्यावेळी प्रदीप कर्णिक ग्रंथपाल होते त्याना भेटायला डॉ.अरुण टिकेकर, रमेश तेंडुलकर,विश्वास पाटील,विजय तापस केशव मेश्राम,अविनाश कोल्हे, चंद्रकांत भोंजाळ असे अनेक दिग्गज यायचे.मी सांताक्रूझ डॉक्टर यांच्याकडून निघून माटुंग्याच्या रुपारेल कॉलेजात यायचो.त्यावेळी माझे मुंबईत ऑफिस नव्हते.
त्याकाळात या दोघां कर्णिक बंधूंनी मला अनेक नवनवीन पुस्तकें सुचवून मला जे प्रेम दिलं आहे. आधार दिला आहे. ते मी कधीचं विसरू शकत नाही.असाच एक सळसळत्या रक्ताचा कोकणातून आलेला अस्वस्थ कवी महेश केळुसकर मुंबईत आला.आणि आम्हां तिघांच्या अभेद्य मैत्रीचा एक नवीन अध्याय सुरू झाला.महेश केळुसकर यांचं साष्टांग नमस्कार सुनील कर्णिक यांच न छापण्या जोग्या गोष्टी आणि प्रदीप कर्णिक यांच जावे ग्रंथाच्या गावा हि पुस्तकें डिंपल पब्लिकेशनच्या रौप्य महोत्सवी समारंभात तिघांची पुस्तकें प्रकाशित करण्यासाठी त्याची तयारी चालू होती.माझ्या गिरगावच्या ऑफिसमध्ये रवी प्रकाश कुलकर्णी आले.व मला म्हणाले आज सुनीलचा वाढदिवस आहे. त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स मध्ये वाढदिवस छापून येत नव्हते.मी रवी प्रकाश कुलकर्णी यांना म्हटल ब्रह्मा,विष्णू आणि महेश आता ऑफिसला येणार आहेत.मग मी बायंडरकडे गेलो. तिघांची तीन पुस्तकं बायडीग करून घेतली.आणि रात्री दादर पूर्वेच्या बारमध्ये केक कापून रवी प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते तिन्ही पुस्तकांचे प्रकाशन केले.महेशने बार,बार दिन ये आये....हे गाणं म्हटलं.कविता गायल्या.एक सूरमयी संध्याकाळ आम्हीं सर्वांनी तिथं साजरी केली.
ब्रह्माविष्णू महेश अशीच मी या तिघांची सर्वांना ओळख करून देतो.सुनीलने अनेकांना पुस्तकं प्रकाशित करण्यासाठी मदत केली आहे.तसाच एक प्रयत्न त्यानं स्वतः प्रकाशनात हि मुसफिरी केली आहे. भाऊ पाध्यें यांच सजती है युं हि मेहफील हे पुस्तक आणि चंद्रकांत खोत यांच दुरेघी हि कादंबरी अशी दोन पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती.पण एका ठिकाणी जास्त काळ रेंगाळणारा सुनीलचा स्वभाव नव्हता.त्यामुळे तो प्रयत्न तिथंच थांबला.पण इत्तराना पुस्तकें सुचवणे हे त्यानं चालूच ठेवलं.मी, सुनील,महेश,प्रदीप नियमितपणे संध्याकाळी दादरला भेटायचो. कधी,कधी शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर तर शिवाजी मंदिरला माझे मित्र शशी भालेकर यांच्या ऑफिसात कवितेवर साहित्यावर चर्चा व्हायची.ते दिवस आमचे भारावलेले होते.
प्रिया तेंडुलकर यांच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन पार्ल्याच्या टिळक मंदिर येथे मी आयोजित केल होत.त्यावेळी सुनीलने सुचवल प्रियाची मुलाखत महेशने घ्यावी.जबाबदारी माझ्यावरचं आली. प्रिया त्यावेळी नानावटी हॉस्पिटलच्या वरील सभागृहात तिच्या टॉक शोची शूटिंग करीत होती. त्या शेड्युलमधून वेळ देणं तिला कठीण होतं.पण अखेर प्रियाचा मी होकार घेतला.त्या कार्यक्रमास साक्षात शिरीष पै विजय तेंडुलकरसह अनेक दिग्गज मंडळी आली होती.ती मुलाखत महेशने खूप सुंदर घेतली होती. प्रियापण खूष होती.२०१८ साली सुनीलची न छापण्या गोष्टी महानगर दिवस महाराष्ट्रातील साहित्यिक सस्थांनं म्हाताऱ्या बायका काय कामाच्या सोन आणि माती मलिका अंबर माहितीचा कचरा,भालचंद्र नेमाडे' अशा सहा पुस्तकांचे प्रकाशन मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय नायगाव दादर येथे विजय तापस,सुमेध वडा वाला संजय पवार यांच्या उपस्थित केला.त्यावेळी रत्नाकर मतकरी आणि गणेश मतकरी हे कार्यक्रमास आले होते.
सुनील ७५ व्या वर्षात पदार्पण करतोय.हा एक मोठा योग आहे.आनंद सोहळा आहे.या माणसाने अनेकांस नवीन नवनवीन कल्पना देऊन मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.अनेक शिष्यगण तयार केले आहेत.याची जाणीव सर्वांना असेलच.या त्याच्या वाटचालीत त्याला सौ.वहिनींनी खूप मोलाची साथ दिली आहे.त्याचं हि कौतुक आणि अभिनंदन करायला हवं.सुनीलला त्याच्या ७५ व्या वाढदिवसाच्या आरोग्यदायी सुख समाधान समृद्धीसाठी खूप खूप हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा...