मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ...
वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास बंदरे विकास व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर आदी यावेळी उपस्थित होते.मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून 8169681697 या व्हॉटस्अप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन' वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिजबाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासांत त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या प्रणालीसाठी महानगरपालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओव्हरसिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. नुकतेच भारतातील जपानचे राजदूत यांनी माझी भेट घेतली होती. त्यांनी देखील बदलेल्या मुंबईचे कौतुक केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्या माध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे १,१५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृश्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुंबईत १७० ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. कोळीवाड्यांचा विकास, प्रदुषणमुक्त मुंबईला चालना देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण.