मुंबई प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील हृदयविकार असलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटातील ४६ बालकांना मुंबई येथील एसआरसीसी बाल रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले. हृदय शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची व पालकांची आज कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शस्त्रक्रिया झालेल्या बालकांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. मुलांना रुग्णालयात योग्य उपचार मिळतील व बालके रोगमुक्त होऊन घरी जातील याबाबत पालकांनी निश्चिंत रहावे असा धीर देत मंत्री खाडे यांनी पालकांना आश्वस्त केले.
सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत इको तपासणी शिबिरामध्ये तपासणी केलेल्या २०५ बालकांपैकी ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदर्शनास आले. आयुष्मान भव: योजनेंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमामधून ४६ बालकांना एसआरसीसी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी १७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर उर्वरित रुग्णांच्या शस्त्रक्रिया दोन दिवसांत पूर्ण होतील. रुग्णालयातील बालस्नेही वातावरण, डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि रुग्णालयाने पालकांना दिलेली सुविधा यामुळे बालक आणि पालकांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. यासाठी रुग्गालयातील सर्व डॉक्टर प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मंत्री खाडे यांनी आभार मानले.
पालकमंत्री खाडे सांगली जिल्हा प्रशासन आणि एसआरसीसी रुग्णालयातील डॉक्टरांचे पालकांनीही आभार मानले. सांगलीपासून मुंबईपर्यंत बालकांची व आमची सर्व काळजी घेतली असे पालक जगन्नाथ पाटोळे यांनी सांगितले.यावेळी एसआरसीसी बाल रुग्णालयाचे संचालक झुबिन परेरा प्रशासकीय अधिकारी चेतन पाटील अमित केरकर सिराज शेजवलकर उपस्थित होते. डॉ. प्रिया प्रधान डॉ. प्रदीपकुमार कौशिक डॉ. गौरवकुमार डॉ.सुप्रतिम सेन डॉ. क्षीतिज सेठ यांनी बालकांवर शस्त्रक्रिया केल्या.