मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : ओघवती रसाळ वाणी आणि मार्मिक शैलीने घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे भागवत धर्माचे वैश्विक राजदूत वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू प.पू. गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांचे निधन महाराष्ट्राच्या भागवत आणि भक्ती संप्रदायासाठी मोठी हानी आहे.अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की बाबा महाराजांची रसाळ वाणी निरूपणाची आगळी शैली कर्णमधुर होती.त्यांनी कीर्तन-निरूपण आणि भजन सातासमुद्रापार पोहचवले. बाबा महाराज यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील.त्यांच्या निधनामुळे या संप्रदायातील अधिकारवाणीने मार्गदर्शन करणारा आधारवड अशा स्वरूपाचा विठ्ठल भक्त चिरशांत झाला आहे असे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
आपल्या रसाळ वाणीने समाज प्रबोधन करणारे चक्रवर्ती संत हरपले-कृषिमंत्री धनंजय मुंडे
आपल्या मधुर व रसाळ वाणीतून समाज प्रबोधन करत कीर्तन परंपरेची ख्याती जगभरात पोहोचवलेले ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने राज्यातील एक चक्रवर्ती संत हरपले आहेत अशा शब्दात कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे.बाबा महाराजांनी कायमच आपल्या सुमधुर वाणीतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.त्यांच्या निधनाने राज्यातील एक महान विभूती एक चक्रवर्ती संत हरवले असल्याची भावना मंत्री मुंडे यांनी व्यक्त केली असून त्यांच्या स्मृतीस मुंडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८