ठाणे प्रतिनिधी : क्रीडा संकुलांच्या माध्यमातून देशाचे नाव उज्वल करणारे खेळाडू घडावेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी येथील ठाणे तालुका क्रीडा संकुल उद्घाटन सोहळयाप्रसंगी केले.ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुल ठाणेचे उद्घाटन कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विधानसभा सदस्य आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र पाठक माजी महापौर नरेश म्हस्के जिल्हाधिकारी अशोक शिनगारे ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे तहसिलदार युवराज बांगर जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के तालुका क्रीडा अधिकारी तथा तालुका क्रीडा संकुलाच्या सदस्य सचिव सायली जाधव आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आज आनंदाचा दिवस आहे. खेळाडू आणि एक तंदुरूस्त पिढी घडविणाऱ्या या संकुलाचं आज उद्घाटन होत आहे. ठाण्याचा पालकमंत्री असल्यापासून मी या संकुलाच्या उभारणीचा साक्षीदार आहे आणि आज मुख्यमंत्री म्हणून त्याचं उद्घाटनाचं करण्याचं भाग्य मला मिळालं आहे. मला खात्री आहे या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तालुक्यात जिल्ह्यात नवनवीन खेळाडूंना आपलं कसब दाखविण्याची संधी मिळेल आणि त्यातून चांगले खेळाडू आपल्या जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं प्रतिनिधीत्व करतील.त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.
ठाण्याला खेळ आणि खेळाडू यांच्या विजयाचा मोठा इतिहास आहे. देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात आजवर झालेले आहेत. एक काळ असा होता की हनुमान व्यायाम शाळा आनंद भारती मावळी मंडळ आर्य क्रीडा मंडळ या काही निवडक ठिकाणीच फक्त खेळण्याची संधी असे.व्यायाम करणे व स्थानिक स्पर्धांमध्ये पदके मिळवणे यापलिकडे कुणी खेळाकडे गांभीर्याने पाहत नव्हतं.ही उणिव दादोजी कोंडदेव स्टेडियममुळे भरुन निघाली.तिथे आता अॅथलेटिक्सचे 6 ट्रॅक्स आखले गेले हायजंप लाँगजंप गोळाफेक आदी खेळांना उत्तम व्यासपीठ मिळाले. क्रिकेटची 2 उत्तम पिचेस तयार झाली. दरवर्षी अॅथलेटिक्स टेबलटेनिस बॅडमिंटन क्रिकेट कब्बड्डी खो-खो इ. खेळांच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील महापौर चषक स्पर्धा ठाण्यात होतात.मॅरेथॉनला प्रचंड प्रतिसाद मिळतो.ठाणे तालुका क्रीडा संकुल हे त्या या क्रीडा क्षेत्रातले पुढले पाऊल आहे.काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडविण्याचे काम इथे होणार आहे. राज्यात खेळ आणि खेळाडूंना पोषक असं वातावरण आहे, असे सांगून ते म्हणाले प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपण छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे युवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होते.देशभरातील सर्वच राज्यातील युवा आणि खेळाडू त्यात सहभागी झाले होते. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षानंतर राष्ट्रीय स्तरावरचा हा युवा मेळावा आयोजित करण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली होती आणि ती आपण यशस्वी करून दाखवली.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणारी पुढची पिढीही तितकीच सक्षम आणि तंदुरूस्त असणं आवश्यक आहे.त्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा युवा मेळावे आयोजनासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. ठाण्याचा सुपुत्र रुद्रांक्ष पाटीलने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आपल्या चमकदार कामगिरीने देशाचं आणि पर्यायाने आपल्या राज्याचं नाव मोठ केलं. रुद्रांक्ष सारखेच अनेक गुणवान खेळाडू राज्यात आहेत. जे आपल्या जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर झळकवत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये देखील आपल्या राज्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. आपण लहान असताना अनेक मैदानी खेळ खेळायचो. मातीतल्या खेळांची परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यातून शरीर तंदुरुस्त राहतंच पण मुलांची व्यक्तिमत्वांची जडणघडण होत असते.आज मोबाईल इंटरनेटच्या युगात मुलं मैदानांपासून दूरावली आहेत याबाबत चिंता व्यक्त करीत ते म्हणाले मुलांना पुन्हा मैदानी खेळाकडे आकर्षित करणे गरजेचं आहे.त्यात पालकांची जबाबदारी मोठी आहे.त्यांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहित करायला पाहिजे. सरकारही आपली जबाबदारी झटकणार नाही. शासनाच्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येतंय.ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्यात आले आहे. कळवा येथे क्रीडा विभागाला जवळपास 48 एकर जागा दिली आहे. भिवंडी, शहापूर मुरबाड या तालुक्यांमध्ये देखील तालुका क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे.
उल्हासनगर अंबरनाथ कल्याण येथील तालुका क्रीडा संकुलांचा मेकओव्हर सुरू आहे.या सर्व क्रीडा संकुलांचा लाभ ठाणे जिल्ह्यामधील सर्व खेळाडूंना होईल याची मला खात्री आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2036 मधील ऑलिम्पिंक स्पर्धांसाठी भारत तयार असल्याचं जाहीर केलंय. ऑलिम्पिंक स्पर्धेतले खेळाडू घडविण्यासाठी ही संकुले उपयुक्त ठरतील. हेच मिशन डोळ्यासमोर ठेवत आपण मिशन लक्ष्यवेध आपण राबवत आहोत. राज्यात क्रीडा क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत त्यामध्ये तालुका जिल्हा विभागीय क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. बालेवाडी पुणे येथे स्पोर्टस सायन्स सेंटर उभारले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथे नवीन क्रीडा विद्यापीठास 50 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. खेळांडूच्या प्रोत्साहनासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार विजेत्या खेळाडूंच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यात येणार आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेतील (एशियन गेम्स) पदक विजेते खेळाडू आणि मार्गदर्शकांना देण्यात येणाऱ्या पारितोषिक रकमेत दहापट वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मुला-मुलींनी विकसित करण्यात आलेल्या या सुविधांचा वापर करावा आणि क्रीडा क्षेत्रात आपली चमक दाखवावी असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शासनाच्या सन 2012 च्या क्रीडा धोरणानुसार प्रत्येक तालुक्यात तालुका क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे. त्यानुषंगाने ठाणे तालुक्यात तालुका क्रीडा संकुल निर्माण करण्याकरिता क्रीडा विभागाला दि. 9 डिसेंबर 2013 रोजी शासनाकडून 2985.29 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली.शासनाकडून मिळालेला निधी 1 कोटी असून त्यामध्ये सदर संकुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नाही हे जाणून तत्कालीन पालकमंत्री तथा मंत्री नगरविकास महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे यांनी नगरविकास विभागाचा 9 कोटी निधी उपलब्ध करून दिला. या तालुका क्रीडा संकुलास बांधण्यासाठी 4 कोटी अनुदान प्राप्त झाले असल्याचे सांगितले.तसेच क्रीडा संकुलाबाबतची माहिती देताना ते म्हणाले संपूर्णत: सौर ऊर्जेवर चालणारे हे संकुल आहे, ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावाकरीता संकुलामध्ये वेटलिफ्टिंग जिम्नॅस्टिक्स तायक्वांदो किकबॉक्सिंग ज्युडो करम बुद्धीबळ योगा इ.इनडोअर गेम्स तसेच एरोबिक्स अद्ययावत व्यायामशाळा तसेच वैद्यकीय खोली (physio room) गेस्ट रूम स्पर्धा किंवा प्रशिक्षण दरम्यान राहाण्याकरीता 30 मुले व 30 मुली यांचे वसतिगृह कॅन्टीन आणि तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय असे उभारण्यात आलेले आहे आर्टिस्टिक्स जिम्नॅस्टिक्स या खेळप्रकारात आवश्यक असणाऱ्या हवेतील movements (Arial movements) मध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी आवश्यक सुविधा इतरत्र कुठेही उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन या संकुलाचे बांधकाम करताना ह्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करण्यात आला व त्यासाठी आवश्यक असे फोम पिट तयार करण्यात आलेले आहे वेटलिफ्टिंग या खेळासाठी संकुलामध्ये स्वतंत्र इनडोअर हॉल तयार झालेला आहे. खेळाडूना सरावा दरम्यान किंवा स्पर्धेमध्ये होणाऱ्या दुखापतींची काळजी घेण्यास त्यांच्या सरावाचाच एक भाग म्हणून फिजिओथेरपी तसेच आईस बाथ ला देखील येथे प्राधान्य देण्यात आलेले आहे. आणि त्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आलेला आहे. या संकुलामध्ये निवासी प्रशिक्षण शिबीर घेता यावे या करीता खेळाडूंच्या निवास व्यवस्थेची देखील सोय करण्यात आलेली आहे. किमान 30 मुले व 30 मुली राहू शकतील अशी त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तालुका क्रीडा अधिकारी ठाणे यांचे कार्यालय देखील याच इमारतीत तयार करण्यात आलेले आहे.तसेच तायक्वांदो किकबॉक्सिंग ज्युडो कैरम बुद्धीबळ योगा इत्यादिसारखे इनडोअर गेम्सचा सराव करता येईल असे इनडोअर हॉल तसेच एरोबिक्स अद्ययावत व्यायामशाळा गेस्ट रूम येणाऱ्या खेळाडूंसाठी उपाहारगृह यासारख्या सुविधा या संकुलामध्ये देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.तसेच संपूर्ण संकुलाचा विजेचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्याकरीता सोईस्कर ठरेल असे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे.कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील यादृष्टीने सर्वांनीच प्रयत्न केलेले आहेत. ही माहिती दिली.या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमृता दिक्षित यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी केले.