काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

मुंबई प्रतिनिधी : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मेरा युवा भारत:वतन को जानो कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले.काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम.जी.रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

   विविध प्रदेशांना भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले.या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग असून पुढे देखील राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.आपण सर्वांनी एक देश म्हणून एकत्र राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

   यावेळी श्रीनगर अनंतनाग कुपवाडा बारामुल्ला बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक-युवतींनी राज्यपालांशी संवाद साधला.कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते.या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८